पालघर येथील एका विकासकाच्या मुलाच्या लग्नासाठी जयपूर येथे गेलेल्या २४० वऱ्हाडींपैकी तिघांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाय म्हणून पालघर तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा तर्फे वर पित्याला सर्व वऱ्हाड्यांची करोना तपासणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पालघर येथील एक विकासकाच्या मुलाचे जयपूर येथे लग्न असल्याने पालघर येथील १८० ते २०० जण ८ व ९ मार्च रोजी जयपूर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला गेले होते. हे सर्व नागरिक एका चार्टर विमानाने जयपूर येथे गेले असल्याने, त्यांना विवाह समारंभात एकत्र वास्तव्य व वावर केला होता. त्यानंतर १० मार्च रोजी ते पालघरला परतल्यानंतर त्यापैकी तीन जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले.

या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीची बैठक घेऊन संसर्ग झालेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या इतरांना देखील आजारांचे संक्रमण झाल्याची शक्यता पाहता, या सर्व वऱ्हाडींना १४ व १५ मार्च रोजी पालघर ग्रामीण रुग्णालयात करोनाची तपासणी करून घेण्याचे सूचित केले आहे. करोना संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये एक नगरसेवक असल्याचे सांगण्यात येत असून अनेकांना आजाराचे लक्षण असल्याचे सांगण्यात येते. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी ही उपाययोजना हाती घेण्यात आल्याचे पालघरचे तहसीलदााार सुनील शिंदे यानी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.