राज्यात कोविडमध्ये अवयवदानामुळे  सातजणांना जीवनदान मिळाले. सातारा येथील कोमल न्यू लाईफ फौंडेशन, री बर्थ पुणे, फेडरेशन ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, नाशिक या संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला. मेंदू मृत रुग्णांचे अवयव गरजू रुग्णांपर्यंत पोचवण्याचे आव्हान अवयव प्रत्यारोपण समितीने (झेडटीसीसी, पुणे) यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यामुळेच चेन्नई आणि हैद्राबाद तसेच पुणे शहरातील गरजवंत रुग्णांना जीवनदान मिळाले.

३९ वर्षीय महिला घरामध्ये पाय घसरून पडल्याने मेंदूला दुखापत झाली, तसेच रक्तस्त्राव सुरू  झाला.त्या महिलेस दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या नंतर तिला मेंदूमृत घोषित करण्यात आले. नातेवाईकांना अवयवदान करता येऊ शकते व त्याचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे यांच्या मदतीमुळे व अवयव प्रत्यारोपण समितीच्या प्रमुख आरती गोखले यांच्या प्रयत्नांमुळे यकृत दीनानाथ मधील रुग्णाला वापरण्यात आले. तसेच मूत्रपिंड पुण्यातच ज्युपिटर हॉस्पिटलला पाठवण्यात आल्याचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे अवयवदान समन्वयक प्रतीक देशमुख यांनी माहिती दिली. दीनानाथ मंगेशकर तर्फे डॉ. वृषाली पाटील, डॉ. प्रसाद राजहंस, डॉ. सचिन पळणीटकर आणि डॉ. निनाद देशमुख यांचे सहकार्य लाभले.

करोना संसर्गाचे निर्बंध पाहता प्रवास करणे खडतर आहे, अशा काळात हृदय चेन्नईला रामा रुग्णालय तर इतर काही अवयव किमस हॉस्पिटल हैद्राबादला ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने पाठवण्यात आले. या मध्ये समन्वयक सरफराज शेख, स्थानिक पोलीस तसेच  वाहतूक पोलीस यांच्या मदतीने हे आव्हान यशस्वीपणे पार करून वेळेत अवयव पोचवण्यात आले व रुग्णांना एक नवीन आयुष्य मिळाले.

आज या काळामध्ये आपण कोणाला नवीन जीवन देऊ शकतो व आपल्या मरणानंतर कोणाच्यात जिवंत राहू शकतो ते म्हणजे अवयवदानामुळे. आज महाराष्ट्रात काही सामाजिक संस्था अवयवदान चळवळ राबवत आहेत व लोकांमध्ये जनजागृती करत आहेत. कोमल न्यू लाईफ फौंडेशन सातारा, री बर्थ पुणे, फेडरेशन ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, नाशिक अशा संस्थांचा अवयवदान चळवळीत समावेश आहे. राज्यात कोविडमध्ये अवयवदानामुळे सातजणांना जीवदान मिळाले.  जीवनदान अवयव प्रत्यारोपण समिती (पुणे)च्या पुढाकारामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले.