अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणाच्या तपासात अनेक नवनवीन प्रकार उघडकीस येत आहेत. मुख्य सूत्रधार शिवाजी कोळीने १२ वर्षांपूर्वी स्वत:ची किडनी विकली होती तेव्हापासून ही तस्करी त्याने सुरू केल्याची माहिती तपासात पुढे आली असून, या प्रकरणी राज्यातील अनेक डॉक्टर पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे. शिवाजीला आज, सोमवारी न्यायालयाने १४ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राज्यभर गाजत असलेल्या किडनी तस्करी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार समजला जाणारा आरोपी सांगली जिल्ह्य़ातील इस्लामपूरचा शिवाजी कोळी आणि बुलडाणा जिल्ह्य़ातील विनोद पवार या दोघांना रविवारी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी अकोल्यातील अगोदरच अटकेत असलेल्या देवेंद्र शिरसाट व आनंद जाधव या दोघांकडून पोलिसांना काही नावे मिळाली आहेत. शिवाजी कोळीला रविवारी रात्री उशिरा त्याला अटक केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. कोळी हा या रॅकेटमधील प्रमुख आरोपी असून त्याने किती जणांच्या किडनी काढल्या, त्याचे हे जाळे कुठपर्यंत पसरलेले आहे आदी महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. आज त्याला न्यायालयाने १४ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तीन आरोपी या अगोदरच पोलीस कोठडीत आहेत.
शांताबाई खरात हिच्या तक्रारीनुसार, ५ लाख रुपयांमध्ये किडनी विकण्यासाठी आनंद जाधव व देवेंद्र शिरसाट यांनी बुलडाणा जिल्ह्य़ातील मेहकर तालुक्यातील मांडवा येथील विनोद पवारशी तिची ओळख करून दिली. त्यानंतर पवारने शांताबाईला औरंगाबादला नेले. तेथे तिची वैद्यकीय तपासणी केल्यावर किडनी काढण्यात आली होती. श्रीलंकेत दोघांच्या, तर औरंगाबादेत तिघांच्या किडनी काढण्यात आल्याची माहिती आहे.
बुलढाणा जिल्ह्य़ातील विनोद पवारने स्वत:साठी किडनी खरेदी करून प्रत्यारोपण केले होते तेव्हापासून ते दोघे संपर्कात येऊन किडनी खरेदी-विक्रीचा धंदा सुरू केला. शिवाजी कोळी याचा डॉक्टर मुलगा विजय यास दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते, पण कोळी हजर झाल्याने त्यास सोडून देण्यात आले. कोळी याच्याकडे पासपोर्ट सापडला असून, तो एकदा श्रीलंकेतही गेलेला आहे. कोळी इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊ राव पाटील महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर आहे. या प्रकरणी आता एकूण चार आरोपी पोलीस कोठडीत असून, मुख्य आरोपी पोलीस कोठडीत असल्याने तपासाला वेग येण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात राज्यातील औरंगाबाद, नागपूर व इतर शहरातील काही मोठे डॉक्टरही पोलिसांच्या रडारवर आहेत.
या प्रकरणात त्यांच्या सहभागाची शक्यतांची खातरजमा करून त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टरांची एक समितीही गठीत करण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या तपास कामासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आले आहेत.
यातील आरोपींची संख्या
वाढण्याची शक्यताही पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.

पथक श्रीलंकेला जाणार?
अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणाची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे. या प्रकरणातील दोघांची किडनी श्रीलंकेतील कोलंबोत काढण्यात आली. त्यामुळे तपासासाठी अकोला पोलिसांचे एक पथक श्रीलंकेत जाणार असल्याची माहिती आहे.