• अवयव प्रत्यारोपणाने अनेकांना जीवदान
  • पोलिसांनी उपलब्ध केला ‘ग्रीन कॉरिडॉर’
  • नागपूरहून प्रथमच हृदय मुंबईत

मेंदूमृत रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा घेतलेला निर्णय, डॉक्टरांची तत्परता, पोलिसांनी उपलब्ध केलेला ‘ग्रीन कॉरिडॉर’ यामुळे गुरुवारी विमानाने रुग्णाचे हृदय मुंबईत, यकृत पुण्यात नेण्यात आले व तेथे संबंधित गरजूंवर त्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. दुसरीकडे मूत्रपिंड नागपूरच्या रुग्णालयांत पोहोचवून प्रत्यारोपण करण्यात आले. त्यामुळे एकाच्या अवयवदानातून अनेकांना जीवदान मिळाले आहे. रुग्णाची त्वचा आणि बुब्बुळही दान करण्यात आले असून त्यातूनही गरजू रुग्णांना लाभ होईल. नागपूरहून मुंबईत प्रथमच हृदय यशस्वीरित्या पाठवले गेले आहे.

झनेश पशिने (४९) रा. गोंदिया असे मेंदूमृत रुग्णाचे नाव आहे. ते महाराष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरणमध्ये स्थापत्य अभियंता या पदावर सेवारत होते. त्यांना पत्नी मनीषा, एमबीबीएसच्या द्वितीय वर्षांतील एक आणि अकरावीला शिकणारी एक अशा दोन मुली आहेत. २२ ऑगस्टला झनेश आंघोळीला जात असताना पडले आणि त्यांचे निम्मे शरीर लुळे पडले. प्रथम गोंदियातील बजाज रुग्णालयात व त्यानंतर नागपूरच्या न्यूरॉन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मेंदूतील रक्तस्त्राव थांबवण्याची शस्त्रक्रिया शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर औषधोपचार करण्यात आला. परंतु झनेशकडून प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यानच्या काळात मेंदू मृत झाल्याचे तपासणीत आढळून आले. न्यूरॉन्सचे डॉ. संजय पाखमोडे, डॉ. प्रमोद गिरी, ऑरेंज सिटी रुग्णालयाचे डॉ. अशोक अरबट यांनी ही माहिती अवयव प्रत्यारोपण समितीच्या डॉ. विभावरी दाणी आणि डॉ. रवी वानखेडे यांना दिली. डॉ. वानखेडे यांनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने पशिने कुटुंबाला अवयव प्रत्यारोपणाचे महत्त्व सांगितले. पत्नी मनीषाने मन घट्ट करून त्याला होकार दिला. त्यानंतर समितीने रुग्ण  ‘मेंदू मृत’ घोषित करून मुंबईच्या ग्लोबल आणि पुण्याच्या आदित्य बिर्ला रुग्णालयाशी संपर्क साधला. मुंबईला ३३ वर्षीय पुरूष रुग्णाला हृदयाची आणि पुण्याला ६४ वर्षीय महिलेला यकृताची गरज होती. त्वरित निर्णय घेऊन मुंबईहून एअर अॅम्बुलन्स मागवून हे अवयव तेथे पोहोचवून वेळेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. विमान प्रथम मुंबई व त्यानंतर पुण्याला गेले.

दरम्यान, नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात एका ४० वर्षीय पुरूष आणि केअर रुग्णालयात एका ३१ वर्षीय पुरूषांवर मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. रुग्णाची त्वचा ऑरेंज सिटी रुग्णालय, बुब्बुळ माधव नेत्रपिढीला दान केले गेले. पशिने कुटुंबीयांच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे अनेकांच्या जीवनात प्रकाश पडल्याने त्यांच्या अवयवदानाच्या सकारात्मक निर्णयाने समाजात चांगला संदेश जाणार आहे.

प्रत्यारोपणातून पती जिवंत राहणार

घरातील एकुलती एक कमावती व्यक्ती गेल्याचे तीव्र दुख आहे. मनाला प्रचंड वेदना होत आहेत परंतु त्यांच्या अवयवदानातून झालेल्या विविध प्रत्यारोपणातून अनेकांना जीवदान मिळाले आहे. या अवयवातून माझे पती विविध रुपाने जगात राहणार आहे. त्यांनी अवयवदानाची इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार हा निर्णय घेतला आणि पुढील प्रक्रिया केली.   – मनीषा पशिने, गोंदिया

अवयव ३.५८ मिनिटांत विमानतळावर

मेंदूमृत झनेशचे अवयव काढण्यासाठी त्याला न्यूरॉन्समधून ऑरेंज सिटी रुग्णालयातून हलवण्यात आले. विमानाच्या वेळेनुरूप शस्त्रक्रिया करून रुग्णाचे हृदय आणि यकृत विमानतळावर तर एक मूत्रपिंड केअर रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याकरिता नागपूर पोलिसांकडून शहरात ग्रीन कॉरिडॉर तयार केले होते. त्यामुळे रुग्णालयातून विमानतळावर ३.५८ मिनिटांत हृदय आणि यकृत पोहोचले. जून महिन्याच्या तुलनेत हे अवयव दोन सेकंद पूर्वीच पोहोचले. त्याकरिता पोलिसांनी दोन पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह ४० इतर कर्मचारी तैनात केले होते. रुग्णवाहिका बंद पडल्यास एक टोईंग व्हॅन लावण्यात आली होती. नागपूरकरांनी स्वतहून वाहने सुमारे १० मिनिटे थांबवून ठेवल्याने त्यांनी या आदर्श कार्यात अप्रत्यक्षरीत्या पोलिसांची मदत केल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी सांगितले.

नागपूरहून मुंबई वा इतरत्र गेलेले अवयव

नागपूर मार्गे आतापर्यंत वर्धा जिल्ह्य़ातून २, अमरावतीहून १, नागपूरहून १ यकृत विशेष विमानाने मुंबई वा इतरत्र नेऊन त्याचे रुग्णांमध्ये प्रत्यारोपण झाले आहे. या प्रकरणात प्रथमच गोंदियाच्या व्यक्तीचे हृदय मुंबईला तर यकृत पुणे येथे नेऊन गरजू रुग्णांमध्ये त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले.