सेंद्रिय शेतीची उत्पादने आरोग्यासाठी संजीवनी देणारी आहेत. जगात सेंद्रिय उत्पादनाला मोठी मागणी आहे. सिंधुदुर्गातदेखील सेंद्रिय शेतीसाठी ७ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून दोडामार्ग तालुका सेंद्रिय म्हणून विकसित करण्यात येत आहे. जिल्हा सेंद्रिय काजूचे धोरणदेखील निश्चित केले असल्याचे राज्याचे वित्त, नियोजन, गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, बाळासाहेब परुळेकर, रामानंद शिरोडकर, रणजीत सावंत, जिल्हा नियोजन मंडळाचे सद्य  प्रकाश परळ, जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी शेळके, कृषी अधिकारी प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या विकासात सेंद्रिय शेती धोरणाला प्राधान्य देण्यात येत असून कृषीच्या विविध सेंद्रिय धोरण राबविले जाईल. काजू पीक सेंद्रिय आहे त्याचे प्रमाणीकरण करून किंमत वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.

शासनाच्या चांदा ते बांदा योजनेत गीर गायींना प्राधान्य देण्यात आले असून गोधन संवर्धन करून शेतीला पूरक ठरेल याचा प्रयत्न असून नारळ पिकाचा प्रक्रिया उद्योगात समावेश करून शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. श्रीमंती व गरिबीमधील दरी कमी करून शेतकऱ्यांना श्रीमंत बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे पालकमंत्री केसरकर म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ४० हजार कुटुंबे दारिद्रय़ रेषेखालील आहेत. या कुटुंबांना आर्थिक सुबत्ता आणून जिल्हा श्रीमंत होईल. त्यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून पुढील काळात प्रयत्न राहील. सर्वानीच त्यासाठी नियोजन व समन्वयाची भूमिका घ्यावी, नेमकी भूमिका ठरवून काम करावे, असे आवाहन करून जिल्ह्य़ात एक हजार वळण बंधारे बांधले जातील, असेही केसरकर म्हणाले.

जिल्ह्य़ात पर्यटनाची कृषीशी सांगड घालून कृषी  विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी शासन, शेतकरी या सर्वानीच एकत्रित येऊन काम करण्याची गरज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.

या वेळी सिंधुदुर्ग सेंद्रिय शेतीचे अध्यक्ष बाळासाहेब परुळेकर यांनी केसरकर यांचे स्वागत केले. रणजीत सावंत यांनी सूत्रसंचालन तर परुळेकर यांनी प्रास्ताविक केले.