बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असतानासुद्धा मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथे उरुसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी तिघा आयोजकांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची वैयक्तिक हमीपत्रावर सुटकाही करण्यात आली.
शिंदेवाडी येथील दावल मलिक उरुसानिमित्त शनिवारी बलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यास कायमस्वरूपी बंदी घातली आहे. न्यायालयाचा मनाई आदेश असूनसुद्धा शनिवारी शिंदेवाडी-केम्पवाड मार्गावर बैलगाडा शर्यती आयोजित केल्याप्रकरणी पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शर्यती आयोजकांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
ग्रामीण पोलिसांनी शर्यतीचे आयोजक लक्ष्मण साळुंखे, उत्तम पाटील व अभय रणदिवे यांना मंगळवारी अटक केली. त्यानंतर त्यांची वैयक्तिक हमीपत्रावर मुक्तता करण्यात आली. या बैलगाडा शर्यतींसाठी आयोजकांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी अशा शर्यती आयोजित करता येणार नसल्याची नोटीसही बजावली होती.