‘स्मार्ट फोन’वरील आभासी दुनियेचे वेड लागलेल्या किशोर वयीन मुलांसाठी ‘पब्जी स्पर्धे’चे आयोजन करण्याचा प्रकार आटपाडीत उघडकीस आला. फलक लावून जाहीर केलेल्या या स्पर्धेसाठी आयोजकांनी बक्षीसही ठेवले होते. मात्र हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करीत ही स्पर्धा मोडीत काढत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आटपाडी येथील पोलीस स्टेशन जवळच असलेल्या बचत भवनच्या मदानावर स्मार्ट फोनवर ऑनलाइन पब्जी खेळाचे सुट्टीच्या दिवशी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकडे तरुण आकर्षति व्हावेत यासाठी फलकही लावण्यात आला होता. तसेच ‘समाज माध्यमा’तून या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३० रुपये प्रवेश फी आणि विजेत्यांना अनुक्रमे तीन, दोन आणि एक हजार रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते.

या खेळात सहभागी होण्यासाठी ५० हून अधिक जणांनी आपली नावे नोंदवली होती. या परिसरात सायंकाळी अचानक मुलांच्या हालचाली वाढल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना या स्पर्धेची माहिती मिळाली. यावर त्यांनी स्वत:च हस्तक्षेप करीत स्पर्धक मुलांना येथून पिटाळून लावले.

याबाबत आटपाडीचे ग्रामसेवक दत्तात्रय गोसावी (वय ३८) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भूपाल मुरलीधर धायगुडे (रा. बलवडी, ता.सांगोला, जि. सोलापूर), अमित हणमंत लांडगे, मंगेश नाथा लांडगे, शैलेश अंबादास लांडगे, रोहित सुभाष लांडगे यांच्याविरुद्ध संबंधित स्पर्धेचे आयोजन, जाहीर फलक लावणे याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांनी ‘पब्जी’ खेळाचे कुणी आयोजन किंवा जाहिरात केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. चोरून कोणी हा खेळ खेळत असल्यास याबाबत माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.