शेंद्रा-बिडकीन डीएमआयसी प्रकल्पातील ‘ऑरिक सिटी’चे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत असतानादेखील ते काम ऑक्टोबपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. हे काम प्रगतिपथावर असून, आतापर्यंत शेंद्रा येथील डीएमआयसी प्रकल्पातील ७० टक्के पायभूत सुविधांचे काम पूर्ण झाले.

शेंद्रा-बिडकीन डीएमआयसी प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर सुरू असून, हा प्रकल्प जवळपास ११ हजार कोटी रुपयांचा आहे. त्यापकी तीन हजार कोटी रुपये केवळ भूसंपादन करण्यासाठी खर्च झाले आहेत. उर्वरित रक्कम ही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खर्च केली जात असल्याचे डीएमआयसीचे सरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकल्पांतर्गत दोन रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येत असून, पहिला उड्डाणपूल हा जालना रस्त्याला जोडणारा आहे. एक कि.मी. अंतराचा हा पूल असून तो सहापदरी राहणार आहे. त्या पुलावरच फूटपाथसाठी स्वतंत्र व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.

या पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असले तरी जून-जुल २०१८पर्यंत त्यावर दुचाकी वाहने धावणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. दुसरा उड्डाणपूल हा करमाड-सटणादरम्यान असून त्या पुलाचे काम सुरूझाले नसल्याचे त्यांनी सांगितले. तो पूल समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ऑरिक सिटीमध्ये २०० सीसीटीव्ही कॅमेरे

ऑरिक सिटीची इमारत बांधण्यासाठी १२९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून ही इमारत पाचमजली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर वाहनतळ आणि नियंत्रण कक्ष असणार आहे. या इमारतीमध्ये जवळपास २०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. त्याच बरोबर अग्निशमन यंत्रणादेखील कार्यान्वित राहणार असून, ते सर्व नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार आहेत. पाचवा मजला हा विविध कंपन्यांना भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे. यामध्ये बँकिंग, विमा आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. डीएमआयसी प्रकल्पातील ६३ कि.मी.चे अंतर्गत रस्त्यांचे कामदेखील डिसेंबपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. या सिटीमध्ये ऑरिक सिटी परिसर आणि डीएमआयसी प्रकल्पात हायटेन्शन विजेची तार किंवा अन्य कोणत्याही तारा वरून जाणार नाही. त्यात नीटनेटकेपणा असावा म्हणून सर्व वायर भूमिगत पद्धतीने नेण्यात येणार आहे. त्या वायर टाकण्यासाठी स्वतंत्रपणे सिंमेटचे डक तयार करण्यात आले असून, त्यात बिघाड झाला तर दुचाकी घेऊन जाऊन ती दुरुस्ती करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

१६ पुलांचे काम अंतिम टप्प्यात

डीएमआयसी प्रकल्पामध्ये लहानमोठे जवळपास १६ पूल उभारण्यात येत असून, त्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहे. त्याचबरोबर विजेचे पाच सब स्टेशनचे काम करण्यात येणार असून, त्यापकी दोन सब स्टेशनची कामे सुरू झाली असल्याचे पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, गजानन पाटील, समन्वयक किसनराव लंवाडे, विष्णू लोखंडे यांची उपस्थिती होती.