जिल्ह्यात गुरूवारीच करोना पॉझिटिव्ह रुग्णांनी शंभरी पार केली असताना त्यात शुक्रवारी आणखी १२ रुग्णांची भर पडली. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या आता ११६ वर गेली आहे. उस्मानाबादकरांना आतापर्यंत बाहेरील जिल्ह्यातून आपल्या गावी परतलेल्या पॉझिटिव्ह लोकांकडून धोका होता, आता त्यांच्या संपर्कातील लोकांनाही लागण होत असल्याने करोनाची दहशत वाढू लागली आहे.

शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून ४५ जणांचे स्वॅब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यांचे सर्व रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात १२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर ४ संदिग्ध असून २९ निगेटिव्ह आले आहेत.

शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये ८ रुग्ण कळंब तालुक्यातील शिराढोण येथील असून हे सर्व पूर्वीच्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आहेत. तर कळंब तालुक्यातील हासेगाव येथेही दोघेजण आढळून आले असून ते पूर्वीच्या आंदोरा येथील रुग्णाच्या संपर्कात आले होते. तर दोन रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे आढळून आले असून ते पुण्याहून परत आलेले आहेत.