पाकिस्तानच्या पूर्व भागात (सध्याचा बांगलादेश) सीमेवर पाकिस्तानच्या सैन्याशी दोन हात करणाऱ्या व विजयामध्ये सहभाग नोंदविणाऱ्या लष्करातील तुळजापूरच्या एका माजी सैनिकास प्रशासकीय यंत्रणेपुढे हतबल होण्याची वेळ आली आहे. तुळजापूरजवळील आराधवाडीचे हे माजी सैनिक शासनाकडून मिळालेल्या शासकीय जमिनीच्या ताब्यासाठी मागील ४० पेक्षा जास्त वर्षांपासून महसूल दप्तरी चकरा मारत आहेत.

तुळजापूरजवळील आराधवाडीचे आनंदराव दत्तोबा इंगळे भारतीय लष्करात जवान म्हणून कार्यरत होते. शासकीय धोरणानुसार त्यांना इतर जवानांप्रमाणे तुळजापूर तालुक्यातील सावरगाव शिवारात जमीन सर्वे नंबर ४५ मध्ये ८ हेक्टर २९ आर इतकी जमीन सिलिंगअंतर्गत देण्याचे जाहीर करण्यात आले. यानुसार यादीमध्ये त्यांचे नाव येऊन जमिनीचा ताबा घेण्यासाठी हजर राहण्याबाबत इंगळे यांना महसूल विभागाचे एक पत्रही १९७० मध्ये मिळाले. तेव्हा त्यांचे वय होते ३५ वर्षे.

मिळालेल्या पत्रानुसार ३१ मे १९७० रोजी या जमिनीचा महसूल अधिकारी स्वत: जागेवर येऊन इंगळे यांना ताबा देणार होते. परंतु, तत्पूर्वीच भारत व पूर्व पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण होऊन सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द होऊन त्यांना तातडीने कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश झाले. या आदेशानुसार आनंदराव इंगळे देशाच्या पूर्व सीमेवर बंगाल खाडीवर कृष्णानगर ढाका येथे देशसेवेसाठी हजर झाले. तेथे शत्रूशी दोन हात करून भारताने विजयही साकारला. त्यानंतर सुटीवर आल्यानंतर प्रत्येकवेळी इंगळे यांनी महसूल दप्तरी चकरा मारून जमिनीबाबत विचारणा केल्यावर प्रत्येकवेळी काहीतरी कारण सांगून वेळकाढूपणा सुरू झाला.

कोणीच दाद देईनात

जमिनीचा ताबा देण्याच्या तारखेपूर्वीच युद्ध परिस्थितीमुळे बोलावणे आल्याने पूर्व पाकिस्तान सीमेवर जावे लागले. तेथे शत्रूशी लढताना एवढा त्रास झाला नाही तेवढा येथे मागील पन्नास वर्षांपासून महसूल दप्तरी चकरा मारून झाला आहे. आज माझे वय ८५ आहे. तरीही सातत्याने पाठपुरावा करत असलो तरी प्रत्येकवेळी दोन दिवसांनी या, पुन्हा या माहिती घेत आहोत असे उत्तर मिळते. या असल्या यंत्रणेसाठीच आम्ही जीवाची बाजी लाऊन लढलो काय? असा सवालही माजी सैनिक आनंदराव इंगळे विचारत आहेत.