उस्मानाबाद शहर आणि परिसराला सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढले. अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसासोबत जोरदार गारपीट सुरू झाली. सुमारे 20 मिनिटांहुन अधिक काळ सुरू असलेल्या गारपिटीमुळे आंबा, चिकू, ऊस यासह काढून ठेवलेल्या ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाउनमुळे आर्थिक पेचात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर या गारपिटीमुळे आणखी नवे आव्हान निर्माण झाले आहे.

सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास उस्मानाबाद शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यापाठोपाठ गारांचा तडाखा सुरू झाला. वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि त्यासाठी गारपिटीचा तडाखा अश्या नैसर्गिक संकटाला एकाच वेळी तोंड देण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर अचानक आली आहे. वाघोली, सांजा, उस्मानाबाद शहरातील सांजा रोड, बायपास रॉड, शेकापूर, साळुंके नगर, बालाजी नगर या भागात सुध्दा वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असल्याने रब्बी पिकांच्या नुकसानीत वाढ होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसमोर नव्याने आर्थिक पेच निर्माण झाला आहे.

गारपिटीचा सर्वाधिक तडाखा उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली आणि परिसराला बसला आहे. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ पाऊस आणि गारपीट झाल्याने रस्त्यावर आणि शेतांमध्ये गारांचा खच पडला होता. याचबरोबर अवकाळी आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला. काढून ठेवलेली ज्वारी आणि शिवारात उभा असलेला ऊस या गारपिटीमुळे हातचा जाण्याची वेळ आली आहे.
उस्मानाबाद शहरालगत असलेल्या चिकू आणि द्राक्ष बागांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडाखाली कच्च्या कैऱ्याचा सडा पडला. शहरातील उमेश राजे यांच्या सेंद्रिय चिकू बागेला गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले. लॉकडउन कालावधीत पन्नास रुपये किलो याप्रमाणे घरपोच चिकू विक्री करून नुकसान भरून काढण्यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यात गारपिटीने चिकू बाग पुर्णतः उध्वस्त करून टाकल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे