कोरोनाबाधितांची संख्या उस्मानाबादेत दिवसेंदिवस वाढत चालली असून शनिवारी आणखी सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता ७१ वर गेली आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांची चिंता अधिकच वाढली असून बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींनी आता अधिक खबरदारीने आणि काळजीपूर्वक राहाणे गरजेचे आहे.

शनिवारी ५२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ४४ निगेटिव्ह असून सात पॉझिटव्ह आहेत. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये कळंब शहरातील पाच शिराढोण येथील तर एक उमरगा तालुक्यातील बेडगा येथील एकाचा समावेश आहे. बेडगा येथील रुग्ण पूर्वीच्या संपर्कातील आहे. तर कळंब तालुक्यातील शिराढोण येथील रुग्णाने खासगी डॉक्टरकडे तपासणी करुन जिल्हा रुग्णालयात अ‍ॅडमिट झाला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित पाच रुग्ण कळंब शहरातील असून ते कुर्ला (मुंबई) येथील असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे