सध्या देशभरात करोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या लॉकडाउन सुरू आहे. शिवाय लॉकडाउनचा कालावधी वाढण्याची देखील दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत अनेक कष्टकऱ्यांचे हातावर पोट असणाऱ्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहे. प्रशासन सर्वांना .सर्वोतोपरी मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. समाजातील काही दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था देखील यामध्ये पुढाकार घेत आहेत. मात्र तरी देखील अनेकजण या मदतीपासून वंचित असल्याचे दिसत आहे. सामान्य नागरिकांप्रमाणे दिव्यांग देखील लॉकडाउनमुळे अडचणीत सापडले आहेत. अशावेळी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी  दिव्यांगांनीच पुढाकार घेतल्याचे उस्मानाबाद जिल्ह्यात दिसून आले आहे.

येथील दिव्यांग असलेल्या गजानन चव्हाण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या दिव्यांग  सहकार्‍यांना हातवारे करून आवाहन केले. जिल्हा आणि परिसरात लॉकडाउनमुळे हालाखीत अडकलेल्या आपल्या दिव्यांग बांधवांची त्यांनी माहिती दिली. यानंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एक चळवळ सुरु झाली. उस्मानाबाद जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात सक्षम असलेल्या दिव्यांगांनी  ऑनलाइन रोख रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आणि 20 जणांच्या मदतीतून 25 कुटुंबांना अन्नधान्याची मदत करण्यात आली. कोणाच्याही मदतीची वाट न पाहता, स्वखर्चातून एकमेकांच्या मदतीला धावलेल्या दिव्यांग तरुणांचा हा अबोल आदर्श प्रेरणादायी असाच आहे.

ओरडून सांगितले तरी एकमेकांचे दुःख समजून न घेण्याची परिस्थिती ओढावलेली आहे. अशा असंवेदनशील काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील 20 दिव्यांग तरुणांनी अनोखा आदर्श घालून दिला आहे. निसर्गाने ऐकण्याची आणि बोलण्याची शक्ती हिरावून घेतली असली तरी डोळ्यांची भाषा काळजाला भिडली आणि दिव्यांग तरुण एकमेकांच्या मदतीला धावले. कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता स्वखर्चातून 20 तरुणांनी 25 कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा पर्याय स्वीकारल्यानंतर हातावर पोट असलेल्या अनेकांचे हाल सुरू झाले. अनेकांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या दुःखद अनुभवांना वाट करून दिली. प्रशासन, सामाजिक संस्था, वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते यांच्या कानावर ज्यांचे दुःख गेले, त्यांना थोड्याबहुत प्रमाणात का होईना दिलासा मिळाला. मात्र  ज्याला बोलताच येत नाही, त्याचे दुःख प्रशासनापर्यंत पोहचलेच नाही. त्यामुळे मोलमजुरी करून चरितार्थ भागविणार्‍या उस्मानाबाद शहर आणि परिसरातील दिव्यांग असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.  त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन किंवा स्वयंसेवी संस्था पुढे येतील याची वाट न पाहता, शहरातीलच काही दिव्यांग तरुणांनी पुढाकार घेत कौतुकास्पद कार्य केले आहे.

उस्मानाबाद येथील गजानन चव्हाण यांनी दिव्यांग असलेले त्यांचे सहकारी सचिन डोंगे, नयीम सय्यद, सुलतान शेख, मुखीद शेख यांच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅपवर मदतीसाठी हातवारे करुन आवाहन केले. जिल्हाभरातील सक्षम असलेल्या दिव्यांग तरुणांनी या  आवाहनास प्रतिसाद दिला. प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार ऑनलाइन रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. दिवसभरात 20 जणांनी रोख रक्कम जमा केल्यानंतर 25 कुटुंबातील दिव्यांग सदस्यांना गहू, ज्वारी, साखर, गोडतेल, साबण, अशा अत्यावश्यक वस्तूंची मदत गजानन चव्हाण आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घरपोच केली आहे. निसर्गाने वाचा आणि ऐकण्याची क्षमता हिरावून घेतली असली तरी सामान्य लोकांनाही आदर्शवत वाटेल अशी  संवेदनशीलता या  दिव्यांग तरुणांनी आपल्या कृतीतून समाजासमोर मांडली आहे.