उस्मानाबाद जिल्ह्यातील दिवसेंदिवस करोना चाचण्या आणि बाधित रूग्णांच्या संख्येत भर पडत असली, तरी दुसरीकडे रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक असून ७६.७९ टक्के इतक्या प्रमाणात रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सध्या २ हजार ४०० रूग्णांवर उपचार सुरू असून आजवर ३६७ जणांचा करोनाने बळी घेतला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ३८३ संशयित रूग्णांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ११ हजार ९८३ रूग्ण करोनाबाधित आढळले होते. पैकी आजपर्यंत ९ हजार २०२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सोमवारी १७० जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. तर ३५३ जणांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी २१६ जणांना करोनाची बाधा झाली आहे. सर्वाधिक रूग्ण उस्मानाबाद शहर व तालुक्यात आढळले असून ७९ जणांना बाधा झाली आहे. त्यापाठोपाठ तुळजापूरमध्ये १८, उमरगा १९, लोहारा २, कळंब २९, वाशी २३, भूम १६ व परंडा तालुक्यात ३०, असे एकूण २१६ रूग्ण बाधित झाले आहेत.

दिवसभरात आठ जणांचा करोनाने बळी घेतला असून आजवर ३६७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी बहुतांश रूग्ण ज्येष्ठ नागरिक आहेत. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ६३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सध्या २ हजार ४१४ जणांवर विविध रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान रूग्ण बरे होण्याचे प्रमाण दोन महिन्यात १० टक्क्यांनी वाढून ते ७६ टक्क्यापर्यंत पोहचल्याने आरोग्य प्रशासनासह जिल्हावासीयांना काहीअंशी का होईना दिलासा मिळाला आहे.