21 January 2021

News Flash

उस्मानाबाद: करोनाचे उशिरा निदान; ५२ टक्के रुग्णांचे मृत्यू

आता दर शुक्रवारी मृत्यू प्रमाणाचा लेखाजोखा

संग्रहित छायाचित्र

उस्मानाबद जिल्ह्यात कोरोनामुळे ४११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील तब्बल ३१ टक्के रूग्ण दवाखान्यात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत दगावले आहेत. तर २१ टक्के रूग्णांचा उपचारादरम्यान ७२ तासांच्या आत मृत्यू झाला आहे. दवाखान्यात रूग्ण दाखल झाल्यानंतर तत्काळ उपचार सुरु करूनही रूग्णांच्या दगावण्याची संख्या साडेतीन टक्क्याहून अधिक आहे. उशिरा निदान झाल्यामुळे उपचारापूर्वीच तब्बल ५२ टक्के मृत्यू नोंदवले गेले आहेत. आता दर शुक्रवारी करोनामुळे होणारे मृत्यू आणि त्याचे प्रमाण याचा स्वतंत्रपणे लेखाजोखा घेतला जाणार आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण रोखण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता १० हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. करोनामुळे दगावलेल्या रूग्णांची संख्या चार शतकाचा टप्पा ओलांडून पाचव्या शतकाच्या दिशेने पुढे सरकत आहे. जिल्ह्यात आजवर ४११ रूग्ण करोनामुळे दगावले आहेत. त्यातील सुमारे ३१ टक्के रूग्ण हे दवाखान्यात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत मरण पावले आहेत. ही संख्या १२८ इतकी आहे. तर उपचारासाठी दाखल झाल्यानंतर ७२ तासांच्या आत २१ टक्के रूग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यांची संख्या ८६ च्या घरात आहे. ४११ पैकी तब्बल २१४ रूग्ण केवळ उशिरा निदान झाल्यामुळे दगावले असल्याचे समोर आले आहे. करोनामुळे झालेल्या मृत्यूचा लेखाजोखा शुक्रवारी जिल्हा शासकीय रूग्णालयात करण्यात आला. आता दर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता मृत्यू प्रमाण रोखण्यासाठी हा लेखाजोखा केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील करोनामुळे वाढलेले मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आणि त्यात घट आणण्याकरिता विभागनिहाय चार पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. सतीश सुरवसे, डॉ. अरूण मुळे, डॉ. प्रवीण डुमने यांचा समावेश आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी डॉ. पल्लवी धनके, डॉ. अर्जुन निपाणीकर, डॉ. स्नेहल, डॉ. पुनम शिंदे आणि डॉ. रूक्साना चौधरी यांना नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाने दररोज सकाळ व संध्याकाळ दोनवेळा रूग्णांची तपासणी करणे, नेमून दिलेल्या दिवशी आवश्यकतेनुसार २४ तास कार्यरत राहणे, अशा सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत.

लवकरच जिल्हा रूग्णालयात ‘डी-डायमर’ यंत्र

उशिरा निदान झाल्यामुळे वाढत असलेले मृत्यूचे प्रमाण रोखणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे रूग्ण दाखल झाल्यानंतर तत्काळ त्याच्यावर उपचार सुरू करण्यासाठी आवश्यकता त्या सर्व सुविधा जिल्हा रूग्णालयात उभारल्या जात आहेत. त्याकरिता जिल्हा प्रशासनाने डी-डायमर यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी दोन दिवसांत जिल्हा शासकीय रूग्णालयात डी-डायमर यंत्र कार्यान्वित होईल, असेही जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 5:21 pm

Web Title: osmanabad late diagnosis of corona 52 percent of patients die aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 महिला अत्याचार, बंद मंदिरांविरोधात भाजपाचं आंदोलन
2 “मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असून विधवेसारखी”
3 “जास्त चर्चा करु शकत नाही,” मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर भुजबळ नाराज?
Just Now!
X