वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेच्या निवडणुकीत अखेर भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांनी ७६ मतांनी विजयी मिळवला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे पराभूत झाले आहेत. एकूण १००३ मतांपैकी धस यांना ५२७ तर जगदाळे यांना ४५१ मते मिळाली. तर २५ मते बाद ठरवण्यात आली आहेत.

या निवडणुकीत भाजपाकडे राष्ट्रवादीपेक्षे सुमारे १०० मते कमी असताना देखील त्यांचा विजय झाला. यावरुन त्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. मात्र, आता या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पर्यायाने धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसला असून पंकजा मुंडेंसाठी हा निकाल आगामी निवडणुकीत आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो.

दरम्यान, मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर धस यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. पहिल्याच फेरीत याबाबत चित्र स्पष्ट होईल असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले होते. मात्र, मतमोजणीत गोंधळ असल्याचे सांगत राष्ट्रवादीप्रणित उमेदवार अशोक जगदाळे यांनी पुन्हा मतमोजणी घेण्याची मागणी केली. त्यामुळे मोजणीच्या ठिकाणी काहीकाळ तणावाचे वातावरण होते. मात्र, त्यानंतर निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला. यात भाजपाचे सुरेश धस ७६ अधिक मतांनी विजयी झाले.

दरम्यान, बीड नगर परिषदेच्या दहा सदस्यांना पालिकेत कचरा टाकला म्हणून राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी १० नगरसेवकांना अपात्र ठरविले होते. हे आदेश रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या अपात्र नगरसेवकांची मते एकत्रित करून मोजणी करावी असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यामुळे उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचा मार्ग मोकळा झाला होता.

यासंदर्भात कोर्टात ५ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यांपैकी एक याचिका कोर्टाने फेटाळली तर इतर चार याचिका निकाली काढल्या आणि तत्काळ मतमोजणीचे आदेश दिले. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीला अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला होता. या मतदारसंघासह राज्यातील इतर सहा जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक झाली होती. त्यानंतर वाद निर्माण झाल्याने ही जागा वगळता सर्व जागांचे निकाल २४ मे रोजी जाहीर झाले होते.