नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) शहरातील कुरेशी गल्लीतील एका घरावर छापा मारून पोलिसांनी साडेचार टन गोमांस आणि जिवंत जनावरे ताब्यात घेतली आहेत. या कारवाईत एकूण साडेसहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नळदुर्ग पोलिसांनी एवढ्या मोठ्या स्वरूपात पहिल्यांदाच धाडसी कारवाई करून गुन्हा नोंद केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नळदुर्ग पोलिसांना रविवारी कुरेशी गल्ली येथील बडेसाब कुरेशी यांच्या घरात काही व्यक्ती गोवंशीय प्राण्यांची कत्तल करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस निरीक्षक ए. पी. घोडेवार यांनी पथकासह रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बडेसाब कुरेशी यांच्या घरावर छापा टाकला. अचानक पोलिसांनी छापा टाकल्यामुळे गोंधळून गेलेल्या आरोपींपैकी दोघेजण पोलिसांना गुंगारा देवून पळून जाण्यात यशस्वी झाले. तर घटनास्थळावरून दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेल्या व्यक्ती घटनास्थळी गोवंशीय प्राण्यांची कत्तल करीत असल्याचे पोलिसांना आढळून आले. हसन बडेसाब कुरेशी आणि बंदेअली कुरेशी अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून चार हजार ४३५ किलो गोमांस जप्त केले आहे. त्याची अंदाजे किंमत सहा लाख २० हजार रूपये असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याबरोबरच सहा जिवंत वासरे, चार लोखंडी चाकू, एक लाकडी ओंडका, असा एकूण सहा लाख ४७ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नळदुर्ग पालिकेच्या सहाय्याने हा सगळा मुद्देमाल जप्त करून त्याचे वजन करण्यात आले. दरम्यान जप्त केलेले साहित्य घेवून जात असताना ट्रॅक्टरला अडवून चालकाला शिवीगाळ केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान जप्त केलेल्या साहित्यातून २६० किलो गोवंशीय मांस आरोपींनी महिंद्रा गाडीतून चोरून नेले असल्याची फिर्याद पोलीस हवालदार शंकर भानुदास मोरे यांनी दिली आहे. त्यानुसार नळदुर्ग पोलिसांत आणखी एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे.