उस्मानाबाद जिल्ह्यात करोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला असून गुरूवारी उमरगा येथील महिलेसह एकुण 8 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथेही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 24 वर पोहचली आहे. रेड झोनकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत चौघांवर यशस्वी उपचार करुन त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या 20 जणांवर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती अत्यावस्थ आहे. त्यातील एकजणावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शासनाकडून शिथिलता आणण्यात येत असताना मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर करोनामुक्त झालेला जिल्हा महिनाभराच्या अवधीनंतर पुन्हा करोनाबाधितांच्या यादीत आला आहे. एकएक करीत जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये आता करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाचा विळखा संबंध जिल्हाभरात घट्ट होत चालला असल्याने अधिक सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात गुरूवारी दिवसभरात 8 जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये लोहारा तालुक्यातील जेवळी येथील 4 जणांचा समावेश आहे. वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथे 1, परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी 1, उमरगा येथे 1 असे एकुण 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, कळंब तालुक्यातील शिराढोण येथून लातूरला गेलेल्या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर लातूर येथे उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील 72 जणांचे स्वॅब मंगळवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. गुरूवारी याचा अहवाल प्राप्त झाला असून 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून दोन अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी दिली.

उस्मानाबाद जिल्हा रेड झोनमध्ये ?
रेड झोनचा जिल्हा किंवा हॉटस्पॉट म्हणून जिल्हा ठरविण्याचे सर्वाधिकार भारत सरकारच्या मिनिस्ट्ररी ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेल्फेअरकडे आहेत. यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या, पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढीचा वेग, चाचण्यांची मर्यादा आणि रुग्णांवर पाळत ठेवून आलेला फीडबॅक यावर रेड झोन ठरविण्याचे अधिकार हेल्थ मिनिस्ट्रीला आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा आता रेड झोनमध्ये गणला जाणार काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.