विहिरीत पोहणार्‍या मुलांना पाहत विहिरीच्या काठावर बसलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांवर काळाने झडप घातली. अचानक विहीर कोसळल्यामुळे विहिरीच्या काठावर बसलेल्या बारा वर्षीय दोन मुलांचा दगडाखाली दबून मृत्यू झाला. विहिरीत पोहण्यासाठी उतरलेली सहा मुले मात्र या दुर्घटनेतून बचावली आहेत. वाशी तालुक्यातील बनगरवाडी येथे रविवारी सकाळी ही घटना घडली.

वाशी तालुक्यातील बनगरवाडी गावालगत असलेल्या एका दगडी विहिरीमध्ये पोहण्यासाठी रविवारी सकाळी काही शाळकरी मुले गेली होती. या विहिरीत पाणी उपलब्ध असल्यामुळे गावातील तरूण आणि शाळकरी मुले येथे पोहण्यासाठी दररोज जातात. रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सहाजण विहिरीत पोहण्यासाठी उतरले. तर करण पिंटू घोडके व विवेक आश्रुबा लांडगे हे दोघे विहिरीच्या काठावर असलेल्या दगडांवर बसून पाहणार्‍या मुलांना न्याहाळत होते. ज्या ठिकाणी हे दोघेजण बसले होते, त्याच बाजूची दरड अचानक विहिरीत ढासळली. त्यामुळे वर बसलेले दोघेही दगडांसह विहिरीतील पाण्यात कोसळले. त्यांच्या अंगावर दगडाचा ढीग साचल्याने दोघांचा बुडून जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेची माहिती गावात वार्‍यासारखी पसरली. संपूर्ण गाव विहिरीच्या काठावर गोळा झाले. सुदैवाने विहिरीत पोहत असलेल्या सहा जणांचा मात्र यात जीव बचावला आहे. पोलीस व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत विहिरीतील पाणी मोटारीच्या सहाय्याने उपसून काढले. दगडाखाली दबलेल्या करण आणि विवेक या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. घटनास्थळी मयत मुलांच्या नातेवाईक आणि पालकांनी एकच आक्रोश केला होता. या दुर्घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.