करोना कक्षात उपचार घेत असलेल्या एका संशयित रुग्णाचा मृतदेह स्वच्छतागृहात आढळून आल्याने गोंधळ उडाला आहे. गुरुवारी सकाळी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र स्वच्छतागृहात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
उस्मानाबाद शहरातील विकास नगर भागातील एका व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणे जाणवत असल्याने, त्याला जिल्हा रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. दाखल केल्यानंतर त्याचे स्वॅबचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले. यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील करोना कक्षात उपचारही सुरू करण्यात आले होते. त्याचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झाला नव्हता, मात्र या अगोदरच ही दुर्देवी घटना घडली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झालं आहे. गुरुवारी सकाळी हा संशयित रुग्ण प्रातर्विधीसाठी स्वच्छतागृहात गेल्यानंतर बराच वेळ बाहेर आला नाही. ही बाब करोना कक्षात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर रुग्णालय प्रशानाने तात्काळ दखल घेत स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हाका मारल्या. मात्र आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे करोना कक्षातच काही काळ गोंधळ उडाला होता.
अखेर रुग्णालयातील कर्मचार्यांनी स्वच्छता गृहाचा दरवाजा तोडला असता, संशयित रुग्ण मृतावस्थेत आढळून आला. करोना कक्षात ही घटना घडल्यामुळे तातडीने पोलिसांना बोलावण्यात आले. या संशयित रुग्णाच्या स्वॅबचा अहवाल आज येणे अपेक्षित आहे. या अगोदरच त्याच्यावर काळाने झडप घातली. शवविच्छेदन केल्यानंतर मृत्युचे नेमके कारण समोर येईल. करोना कक्षातील हा तिसरा मृत्यू आहे. यापूर्वी अन्य आजारामुळे दोन रुग्ण दगावले आहेत. त्यापैकी एकालाही कोरोनाची बाधा झालेली नव्हती. या संशयित रुग्णाच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हा तिसरा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 4:50 pm