उस्मानाबाद

अनलॉक 3.0 च्या पूर्वसंध्येला करोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गुरूवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिवसभरात १७४ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आजपर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या हजारांपार जात १,१६३ इतकी झाली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच उपचारखालील रुग्णसंख्या बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांपेक्षा अधिक नोंदवली गेली. हे प्रमाण काळजी वाढविणारे असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, उस्मानाबाद येथील कोविड चाचणी केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या ५०८ स्वॅबचे अहवाल गुरूवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. यातील तब्बल १७४ अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. अहवालामध्ये उस्मानाबाद शहर व तालुक्यात सर्वाधिक ४९, उमरगामध्ये ४७, तुळजापूरात ३५, कळंबमध्ये २१, वाशीमध्ये १४, परंड्यात ६ तर लोहारा तालुक्यात २ रुग्ण आढळून आले.

आणखी वाचा- Coronavirus : लक्षणे नसलेल्या बाधितांना घरीच उपचार घेण्याची मुभा – पालकमंत्री

उस्मानाबाद आणि उमरगा तालुक्यात संसर्गाचा वेग अधिकच वाढला आहे. सर्वसामान्यांसह वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांनाही करोनाची बाधा होत आहे. जुलै महिन्यात उस्मानाबाद, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यानंतरही संसर्ग आटोक्यात येत नसल्याने आता उस्मानाबाद आणि उमरगा नगर पालिकेच्या हद्दीत दुचाकी बंदीचा आदेशही जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी जारी केला आहे.

३१ जुलैच्या दुपारपर्यंत जिल्ह्यात एकूण करोनाबाधितांची संख्या १,१६३ वर पोहचली असून ५१४ जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. तर ६०० जणांवर सध्या उपचार सुरू असून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.