News Flash

‘दंगलीचे शहर’ ओळख पुसण्यात उस्मानाबादकरांना यश

हिंदी, उर्दू आणि मराठी या भाषांचा एकत्रित गौरव शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने शिवरायांच्या साक्षीने उर्दू कवींना सन्मानित करून करण्यात आला

दीर्घकालीन सामंजस्य आणि एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर राखीत उस्मानाबादकर तरुणांनी उसवलेली ही वीण पुन्हा एकदा घट्ट केली आहे. (छायाचित्र: रोहित बागल)

उस्मानाबाद हा मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेला जिल्हा. ‘धार्मिक दंगलीचे शहर’ ही उस्मानाबादची डागाळलेली ओळख कायम होऊ पाहत होती. धार्मिक ऋणानुबंधाची घट्ट वीण काही समाजकंटक जाणीवपूर्वक विस्कळीत करत होते. दीर्घकालीन सामंजस्य आणि एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर राखीत उस्मानाबादकर तरुणांनी उसवलेली ही वीण पुन्हा एकदा घट्ट केली आहे. त्यामुळे दशकभरापूर्वी ‘दंगलीचे शहर’ अशी असलेली ओळख आपल्या प्रयत्नातून पुसून टाकण्यात उस्मानाबादकरांना यश आले आहे. गुरुवारी झालेल्या मराठा आंदोलनातून पुन्हा एकदा ही बाब प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे.

निजामाच्या राजवटीत राजकारणाच्या अनन्वित छळाला सामोरे गेलेला हा भूभाग आहे. निजामाच्या विरोधात पोलीस कारवाई झाली, आणि येथील सामान्य नागरिकांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सेनेला सशस्त्र सहकार्य केले. रझाकाराच्या अत्याचारामुळे संतप्त झालेल्या काहीजणांनी रझाकाराच्या सेनेबरोबरच येथील सामान्य मुस्लिमांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्यावेळी धास्तावलेल्या मुस्लिम बांधवांना दिलासा आणि आधार देण्याचे काम शेकापचे संस्थापक भाई उद्धवराव पाटील आणि माजी खासदार भाई नरसिंहराव काटीकर देशमुख यांनी दिला होता. त्यानंतर मात्र शहरात वेळोवेळी निर्माण झालेल्या जातीय आणि धार्मिक दंगलींवर नियंत्रण मिळविण्याचे नैतिक धारिष्ट्य कोणीच दाखविले नाही. ते धारिष्ट्य मागील पाच वर्षांपासून विविध समाजातील तरुण उत्स्फूर्तपणे दाखवित आहेत.

शिवजयंती मिरवणूक असो वा गणेश विसर्जन मिरवणूक. दोन गटातील वादाचे पर्यावसन जातीय अथवा धार्मिक दंगलीत व्हायचेच. बाबरी मशीद पडल्याची, खैरलांजीची हृदयद्रावक घटना आणि कानपूर येथे झालेली आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना या बाबी वगळता दंगलीचा पूर्वतिहास पाहता अगदी क्षुल्लक कारणावरून शहर आगीच्या हवाली झाले आहे. अनेकांचे जीव गेले, अनेकजण कायमस्वरूपी जायबंदी झाले. खटले दाखल झाल्याने भविष्याचा रस्ता भरकटलेल्या तरुणांची तर गिणतीच नाही. मागील दहा वर्षांत झालेले सामंजस्यपूर्ण प्रयत्न पाहता शहराच्या डागळलेल्या प्रतिमेला छेद देत नवी कोरी ओळख प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेली धडपड दखलपात्र आहे. यात शहरातील विविध संस्था, संघटना आणि तरुणांचे योगदान सर्वाधिक आहे. पत्रकार संघाच्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धेमुळे या उत्सवाला विधायक वळण लाभले. त्यामुळे पहिल्यांदा महिलांच्या पथकांचे सादरीकरण उस्मानाबाद जिल्ह्यात अनुभवायला मिळाले. उत्सवातील धांगडधिंगा थांबला परिणामी मुस्लिम बांधव मिरवणूक मार्गावर येऊन गणेश मंडळाचे स्वागत करू लागले आहेत.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमुळे संतप्त झालेले उस्मानाबादकर जात, धर्म, लिंग विसरून हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. जिल्ह्याच्या साडेतीन दशकाच्या इतिहासात सामान्य नागरिकांचा एवढा उत्स्फूर्त सहभाग पहिल्यांदाच नोंदविण्यात आला. अगदी हीच भावना काश्मीर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये होती. कोपर्डी येथील घटना घडल्यानंतर राज्यातील पहिला सर्व जाती, धर्माच्या पाच हजार नागरिकांचा उत्स्फूर्त मोर्चा अत्यंत संयमाने उस्मानाबादकरांनी आयोजित केला होता. हिंदी, उर्दू आणि मराठी या भाषांचा एकत्रित गौरव शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने शिवरायांच्या साक्षीने उर्दू कवींना सन्मानित करून करण्यात आला. परिणामी मनातील अंतर कमी झाले. आत्मीय संवाद वाढला. आता शिवजयंतीच्या मिरवणुकीत शेकडो मुस्लिम बांधव आनंदाने सहभागी होत आहेत. राज्यात कदाचित असे चित्र क्वचितच पाहायला मिळत असेल.

बाबासाहेब आंबेडकरांच्या समता सैनिक दलाने शिवजयंतीचे औचित्य साधून शिवरायांना दिलेली मानवंदना, जिजाऊंच्या जयंतीचे औचित्य साधून थकलेले ज्येष्ठ उर्दू शायर शम्स जालनवी यांना मराठवाडा साहित्य परिषदेने दिलेला आर्थिक हातभार, सरस भारत अकादमीच्या माध्यमातून सुरू असलेली वैचारिक घुसळण, ईद मिलनच्या निमित्ताने जमाते इस्लामीच्या वतीने राबविण्यात येणारे विधायक उपक्रम आणि हिंदू, मुस्लिम यांच्या जोडीने दलित, आदिवासी, धनगर, गोसावी, लिंगायत, गोरमाटी, अशा विविध जातीधर्मातील नागरिकांचा शिवजन्मोत्सव सोहळ्यातील सहभाग दंगलीचे शहर ही अवमानकारक ओळख पुसून सामाजिक सलोख्याचा नवा पॅटर्न निर्माण करणारा जिल्हा अशी नवी कोरी ओळख सिद्ध करीत आहे. गुरुवारी मराठा आंदोलनात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात मुस्लिम, धनगर, दलित, लिंगायत बांधवांनी सहभाग घेऊन मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक प्रयत्नांचा परिपाक पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 7:09 pm

Web Title: osmanabadkars success in wiping out city of riots maratha reservation maratha morcha
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड मध्ये संगणक अभियंत्यांची गळफास घेऊन आत्महत्या
2 सनातन संस्था अजून किती लोकांची हत्या करणार? – नवाब मलिक
3 ‘नोकरभरतीत परप्रांतीयांना स्थान मिळाल्याने कंपन्यांची तोडफोड’
Just Now!
X