जिल्ह्य़ातील करोना रुग्णसंख्या नियंत्रणात

पालघर : पालघर जिल्ह्य़ात १०८ प्रणालीअंतर्गत २९ रुग्णवाहिका कार्यरत असून जिल्ह्य़ातील करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून इतर रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. मार्च ते नोव्हेंबर या काळात या रुग्णवाहिका प्रणालीने ४४०४ करोना रुग्ण, तर ७६२४ इतर रुग्णांची सेवा करून अशा रुग्णांसाठी जीवनवाहिनीचे काम केले आहे.

पालघर जिल्ह्य़ात १०८ रुग्णवाहिका प्रणालीमध्ये अंतर्गत २९ रुग्णवाहिका कार्यरत असून त्यांच्या अंतर्गत ६५ चालक व ४६ डॉक्टर सेवेत आहेत. करोनाकाळात त्यापैकी अकरा रुग्णवाहिका करोना रुग्णांसाठी समर्पित सेवा करत असताना ४४०४ रुग्णांच्या सेवेत कार्यरत होते.

सद्य:स्थितीत मनोर ग्रामीण रुग्णालय, बोईसर रुग्णालय, जव्हार रुग्णालय, पोशेरी करोना रुग्णालय तसेच मांडवी व जुचंद्र येथे करोनासमर्पित सहा रुग्णवाहिका कार्यरत आहेत. करोनाकाळात डॉक्टर, चालकाने करोना रुग्णांची हाताळणी करताना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. करोना रुग्ण रुग्णवाहिकेत एकटेच प्रवास करत असताना त्यांची काळजी घेणे आवश्यक होत असे.

मार्च ते नोव्हेंबर या काळात ७६२४ रुग्णांची देखभाल १०८ रुग्णवाहिकांमधून करण्यात आली असून सद्य:स्थितीत प्रसूती, अपघात, सर्पदंश, साथीचे गंभीर रुग्ण अशा रुग्णांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. या सर्व रुग्णवाहिकांची नियमित देखभाल दुरुस्ती करून जिल्ह्य़ातील विविध भागांमध्ये रुग्णसेवेसाठी १०८ रुग्णवाहिका तत्पर ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

मार्च महिन्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाचे २१रुग्ण असताना इतर रुग्णांची संख्या ११०० च्या जवळपास होती. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान इतर रुग्णांची संख्या ५५० ते ७०० च्या दरम्यान राहिले होते. ऑक्टोबर महिन्यापासून करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले असून इतर रुग्णांची संख्या १२००च्या  पलीकडे गेली आहे. एकीकडे काही १०८ रुग्णवाहिका करोना रुग्णांसाठी स्वतंत्र ठेवल्या असताना उर्वरित रुग्णवाहिकांवर वाढीव रुग्णांचा त्राण येत आहे.

महिना      कोविड       इतर रुग्ण

मार्च           २१              ११०९

एप्रिल         २०५              ८४९

मे                २५८              ६९८

जुन             ७२३             ६९३

जुलै             १०३८            ५५३

ऑगस्ट         ७२०             ५४९

सप्टेंबर         ७३५               ५६६

ऑक्टोबर      ५०४             १४२९

नोव्हेंबर         २००             ११७८

जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनासमोर आव्हाने उभी होती. अशा वेळेला रुग्णांना वेळेत उपचार मिळावा व त्यांना करोना समर्पित रुग्णालयात सुरक्षितपणे पोहोचवण्यास प्राधान्य देण्यात आले. याच वेळी इतर रुग्णांना देखील उपचार देण्याचे काम १०८ ने केली आहे.

— अमित वडे, पर्यवेक्षक, १०८ रुग्णवाहिका प्रणाली