एखाद्या सेवेचा अपवाद वगळता प्रशासनाने सुचवलेल्या सर्वच बाबींवरील दर-करांमधील वाढ महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने एकमताने फेटाळून लावत दुरुस्त्यांनिशी अर्थसंकल्प मंजूर केला. मुख्यत्वे पाणीपट्टीतील करवाढ सरसकट नाकारण्यात आली आहे. या दुरुस्त्यांमुळे प्रशासनाने सादर केलेल्या ५१७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात आता मोठे बदल होणार आहेत.
अर्थसंकल्प सादर करून बुधवारी तहकूब करण्यात आलेली ही सभा शुक्रवारी महापौर तथा आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त विलास बालगुडे, उपमहापौर सुवर्णा कोतकर या वेळी उपस्थित होत्या. या अर्थसंकल्पाच्या सभेतही विविध मुद्यांच्या अनुषंगाने नगरसेवकांनी प्रशासनाचे वाभाडे काढले. प्रशासनाने यंदा स्थायी समितीऐवजी थेट मनपाच्या सर्वसाधारण सभेलाच अर्थसंकल्प सादर केला आहे.
येत्या आर्थिक वर्षांच्या (सन २०१५-१६) ५१७ कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात विविध ९ सेवा व सुविधांचे दर-कर वाढवण्याची शिफारस प्रशासनाने केली होती. यातील सात सेवांवरील प्रस्तावित दर-करवाढ सरसकट नाकारण्यात आली. जन्म-मृत्यूच्या दाखल्यातील दुरुस्तीसाठी यापुढे २० रुपये शुल्कवाढ करण्यात येणार आहे. अग्निशमन विभागातील मनपा हद्दीबाहेरील सेवांचे कर वाढवण्यास मान्यता देऊन मनपा हद्दीतील दरवाढ नामंजूर करण्यात आली. वसुली विभागाकडील जाहिरात फलकांचे दर मात्र जसेच्या तसे स्वीकारण्यात आले. उद्यान विभागातील काही उद्यानातील प्रवेशशुल्क व त्यातील सुविधांचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र तीही दरवाढ संबंधित उद्यानांच्या नव्या कराराच्या वेळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित सर्व सेवासुविधांवरील दर-करवाढ फेटाळून सर्वपक्षीय नगरसेवकांनी या गोष्टीवर ठामपणे एकमत दर्शवले. या दुरुस्त्यांचा ठराव करूनच सर्वसाधारण सभेने अर्थसंकल्प मंजूर केला.
‘फुगवलेला अर्थसंकल्प’
मनपा प्रशासनाने सादर केलेले अर्थसंकल्प ५१७ कोटी रुपयांचे असले तरी, हा फुगवलेला आकडा आहे, असे दीप चव्हाण यांनी सभेत स्पष्ट केले. ते म्हणाले, ५१७ कोटी रुपयांतील ३५० कोटी रुपये केंद्र सरकारच्या विविध योजनांचे आहेत. निव्वळ मनपाचे उत्पन्न पाहिले तर हा अर्थसंकल्प अवघ्या सुमारे ८० कोटी रुपयांचा आहे, हे त्यांनी संकलित कर (१३ कोटी), एलबीटी (४० कोटी), पाणीपट्टी (सुमारे ७ कोटी) आणि अन्य उत्पन्न अशा अर्थसंकल्पातील आकडेवारीचाच आधार देऊन सांगितले.
अनेकांचा काढता पाय
अर्थसंकल्पावरील चर्चा अवांतर विषयावरच दीर्घकाळ रेंगाळली. त्याला अनेक नगरसेवकच कंटाळले होते. अनेकांनी मधूनच काढता पाय घेतला. सभा संपताना सभागृहात मोजकेच नगरसेवक उपस्थित होते.