सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने एक रक्कमी एफआरपी देण्यासाठी जाणीवपुर्वक टाळाटाळ करत आहेत. साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली असतानाही, सर्व साखर कारखानंदारांनी एक होऊन शेतकऱ्यांना लुबाडण्याचे कारस्थान रचले आहे. यामुळे या कारखांनदारांना एक रक्कमी एफआरपी देण्याची सुबुध्दी घालावी, अन्यथा पुढील आठवड्यापासून सहकारमंत्र्यांच्या दारात आंदोलनास सुरूवात होणार असल्याचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी देण्यासाठी राजारामबापू साखर कारखाना साखराळे येथे राजारामबापू यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, कुरळप, कासेगांव , पलूस, सांगली ग्रामीण , विश्रामबाग या पोलीस ठाण्यामघ्ये २५० हून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. यामुळे सकाळपासून परिस्थीती तणावपूर्ण झाली होती.

तर, प्रमुख कार्यकर्त्यांना अटक करून आंदोलन मोडून काढण्याचा डाव साखर कारखांनदारांच्या इशाऱ्यावर पोलिसांमार्फत करण्यात आला होता, असा आरोप करण्यात आलेला आहे. शेट्टी यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करत, थेट राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील राजारामबापूंच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेष आंदोलन केले.

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले. केंद्र सरकारच्या निर्यात अनुदान व साखर दरवाढीचे कारण पुढे करून साखर कारखांनदार शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे. जर साखर धंद्यामध्ये एवढ्या अडचणी निर्माण झाल्या असतील, तर साखर संघाच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व कारखांनदारांनी केंद्राच्या विरोधात आंदोलन करायला हवे. राज्यातील कारखांनदार ईडीला घाबरत असल्याने, अन्यायाविरोधात लढण्याची त्यांची हिम्मत नाही. यामुळे येत्या १५ दिवसात कारखांन्यानी सर्व एक रक्कमी एफआरपी खात्यावर जमा न केल्यास, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दारात उग्र आंदोलन होणार आहे.

यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन, येत्या १५ दिवसांत एफआरपीचे एक रक्कमी सर्व पैसे देण्याची हमी दिली. यावेळी राज्य प्रवक्ते शमशुद्दीन सनदे, आप्पासाहेब पाटील , राम पाटील , मानसिंग पाटील , जगन्नाथ भोसले, अनिल करळे, संजय बेले, संदीप राजोबा, राजू माने, सुधीर जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.