आपले राज्यकर्ते कधीही सहिष्णू नव्हते, सफदर हासमीचा मुडदा पडला. सॅटनिक वर्सेसवर बंदी आणली गेली, घाशीराम कोतवाल वादात सापडले ही असहिष्णुताच होती ही खंत ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटक महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी साहित्य संमेलनाचेही उदाहरण दिले. नयनतारा सहगल यांच्याप्रमाणे शेवटच्या क्षणी मला कुणीही येऊ नका असे म्हटले नाही म्हणून मी उद्घाटक म्हणून येथे बोलू शकतो आहे. यवतमाळच्या साहित्य संमेलनानंतर उद्घाटक म्हटलं की मला दचकायला होतं असाही टोला त्यांनी लगावला. तसंच मी नाखुषीनं इथं आलो आहे असंही एलकुंचवार यांनी सांगितलं.

दरम्यान एलकुंचवार मंचावर मनोगत व्यक्त करत असतानाच त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे भाषण करता करताच त्यांनी मंच सोडला. त्यानंतर त्यांना नागपुरातल्या सेव्हन स्टार रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. काही तपासण्या झाल्यानंतर त्यांना घरी पाठवू असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

आजपासून नागपूरच्या रेशीमबाग भागात असलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. तर नागपूरकारांच्या आग्रहास्तव उद्घाटक म्हणून महेश एलकुंचवार यांनी निमंत्रण स्वीकारले. आज संमेलनासाठी ते आले तेव्हा त्यांना घ्यायला कोणीही आले नाही. याच गोष्टीचा राग आल्याने ते बराच वेळ कारमध्ये बसून राहिले होते. अखेर आयोजकांना ही गोष्ट कळली तेव्हा आयोजक त्यांना मंचावर घेऊन आले. मात्र तिथे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले. आयोजकांवर असलेली नाराजी एलकुंचवार यांनी बोलून दाखवली. त्याचमुळे मी नाखुषीने इथे आलो आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.