26 November 2020

News Flash

वर्धा जिल्ह्यातील दोनशे पेक्षा अधिक गावांमध्ये करोनाचा शिरकाव!

वर्धा उपविभागात बाधित रूग्ण असलेली सर्वाधिक गावे असल्याची आकडेवारी समोर

(संग्रहित छायाचित्र)

वर्धा जिल्ह्यातील जवळपास निम्या गावांमध्ये करोनाचा शिरकाव झाला असून, वादग्रस्त ठरलेल्या वर्धा उपविभागात बाधित रूग्ण असलेली सर्वाधिक गावे असल्याची आकडेवारी पूढे आली आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात झपाट्याने करोना संक्रमण होत आहे. त्यापूर्वी प्रामुख्याने शहरी भागात व मोठ्या गावांमध्ये रूग्णांची संख्या आढळून येत होती. आता लहान खेड्यांमध्येही करोनाचा शिरकाव झालेला दिसून येत आहे. पाचशे लोकवस्तीच्या गावात पन्नासवर रूग्ण आढळून येत असल्याचे धक्कादायी चित्र आहे. या संदर्भात लोकसत्तास प्राप्त आकडेवारीनूसार जिल्ह्यातील एकूण ५२० गावांपैकी २०१ गावात करोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी बहुतांश आतापर्यत बरे होवून घरी परतले सुध्दा आहेत. जिल्ह्यातील वर्धा, आर्वी व हिंगणघाट या तीन महसूल उपविभागापैकी सर्वाधिक बाधित गावे वर्धा विभागात असल्याचे दिसून आले आहे. जनता कर्फ्यू, कनिष्ठ व वरिष्ठ अधिकाऱ्यांतील वाद, प्रवेशपत्राचे भरमसाठ वाटप, दंडाची नाहक आकारणी व नंतर तो परत करण्याची नामुष्की अशा व अन्य कारणाने वर्धा उपविभाग नेहमीच चर्चेत राहला आहे. जनता कर्फ्यू लावूनच संसर्ग टाळण्याचा अट्टाहास धरण्यात आल्याने या प्रकरणी आता पालकमंत्री सुनील केदार यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

वर्धा उपविभागात सेलू ६२, देवळी ६३ व वर्धा तालूक्यात ७६ ग्रामपंचायती आहे. यापैकी वर्धेत ३६, सेलूत २६ व देवळीत १६ गावात करोना रूग्ण आढळून आले. म्हणजेच २०० गावांपैकी ७८ गावात आतापर्यंत रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. वर्धा तालूक्यात सावंगी, सेवाग्राम व बोरगाव या तीन गावात सर्वाधिक रूग्णसंख्येची नोंद झाली. देवळी तालूक्यात नाचणगाव, पूलगाव व देवळीत रूग्णसंख्येत प्रथम तीन क्रमांकावर आहे. सेलू तालूक्यात अत्यंत कमी लोकसंख्या असलेल्या धानोली मेघे येथे सर्वाधिक रूग्ण आढळून आले. एकूण वर्धा उपविभागात १ हजार ८१८ रूग्ण सापडल्याची धक्कादायी आकडेवारी आहे. सर्वाधिक दंड आकारणारा व जनता संचारबंदी अंमलात आलेल्या या उपविभागातील रूग्णसंख्या उपायांना फोल ठरविणारी दिसून येते.

आर्वी उपविभागात आष्टी ४१, कारंजा ५९ व आर्वी तालूक्यात ७२ ग्रामपंचायती आहे. आर्वीत ३५, आष्टी २५ व कारंजा तालूक्यात १३ ग्रामपंचायत परिसरात एकूण ३५८ करोना रूग्ण आढळून आले. आर्वी तालूक्यात नागापूर, हैबतपूर व भाईपूर गावात विशेष रूग्णसंख्या राहली. आष्टी तालूक्यात आष्टी, माणिकवाडा व धाडी ही गावे रूग्णसंख्येत आघाडीवर आहे. कारंजा तालूक्यात ठाणेगाव, काकडा व सावळी या तीन गावात सर्वाधिक रूग्णसंख्येची नोंद झाली. हिंगणघाट उपविभागातील हिंगणघाट तालूक्यात ७६ व समुद्रपूर तालूक्यात ७१ ग्रामपंचायती आहे. यापैकी हिंगणघाट तालूक्यात २२ व समुद्रपूरला २६ गावात करोनाबाधित आढळून आले. दोन्ही तालूक्यात एकूण २३३ रूग्णसंख्येची नोंद झाली आहे. हिंगणघाट तालूक्यात वणी, वेळा व रोहणखेडा रूग्णसंख्येत आघाडीवर असलेली गावे आहेत. एकूण ग्रामीण भागातील २०१ गावात २ हजार ४०९ रूग्ण आढळून आले असून त्यापैकी १ हजार ७२७ रूग्ण बरे होवून घरी परतल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी दिली. सुरूवातीच्या काळात गावात रूग्ण आढळल्यानंतर संपूर्ण गावातच प्रतिबंधित उपाययोजना लागू केल्या जात होत्या. प्रामुख्याने शहरालगतच्या गावांना बंदीचा चांगलाच फटका बसला. वर्धेलगत सर्वाधिक रूग्णसंख्या आढळून आलेल्या सावंगी, सेवाग्राम व बोरगाव या गावात मोठ्या प्रमाणात नियम मोडणाऱ्यांकडून दंड आकारणी करण्यात आली. उपविभागीय कार्यालयाने त्याचा गाजावाजाही केला. मात्र ऑगस्टपासून गावबंदीऐवजी ठराविक परिसरच व नंतर बाधित घरापूरतेच उपाय करणे सुरू झाले, असे होवूनही संसर्गाला पूर्णत: रोखण्यात यश आले नाही.

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार या संदर्भात बोलतांना म्हणाले की, गावांची बाधित झालेली व न झालेली अशी वर्गवारी न करता सरसकट सर्वच गावात खबरदारीचे उपाय ग्रामीण यंत्रणेने केले. मात्र आता बाधित न झालेल्या गावांबाबत विशेष खबरदारी घेतल्या जाईल. लहान गावात शक्य नाही, मात्र दोन हजार ते पाच हजार लोकसंख्येच्या बाधित न झालेल्या गावांची माहिती घेण्यात येईल. अशा गावात काही विशेष उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न केल्या जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 9:53 pm

Web Title: outbreak of corona in more than 200 villages in wardha district msr 87
Next Stories
1 नवरात्रोत्सवासाठी गृह विभागाकडून विशेष मार्गदर्शक सूचना
2 मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा निर्णय मागे घेण्याचे सरकारचे आश्वासन
3 Good News! राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक
Just Now!
X