जिल्ह्याबाहेरील रूग्णांच्या माध्यमातून करोनाचा वर्धा जिल्ह्यात प्रसार होत असल्याने जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरत आहे.  धामणगावहून सावंगीच्या आचार्य विनोबा भावे रूग्णालयात दाखल युवतीच्या संपर्कातील तीन महिलांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आल्याने रूग्ण संख्या नऊवर पोहोचली आहे.

या नऊ करोनाबाधितांमध्ये  मुळचे वर्ध्याचे  मात्र मुंबईतून करोना घेवून आलेले तीन रूग्ण, वाशिम‑१, अमरावती‑०४ व गोरखपूर‑१ असे रूग्ण आहेत. यापैकी पाच रूग्णांवर सावंगीत तर चार रूग्णांवर सेवाग्रामच्या कस्तूरबा रूग्णालयात उपचार सुरू आहे. दोन दिवसापूर्वी धामणगावहून दाखल झालेल्या युवतीने नागपूर, अमरावती, धामणगाव इथे उपचार घेतल्यानंतर वर्धा गाठले. याच ठिकाणी तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तिच्या संपर्कातील धामणगावच्या तीन महिलांवर आता उपचार सुरू झाले आहे. ८ मे रोजी आर्वी तालूक्यातील हिवरा तांडा येथील महिलेचा मृत्यू झाला होता. मात्र तिच्या संपर्कातील २८ व्यक्तींची दुसरीही चाचणी निगेटिव्ह आल्याने प्रशासनास दिलासा मिळाला.

आणखी वाचा- उस्मानाबादमध्ये आढळले आणखी सहा करोनाबाधित

बाहेरच्या जिल्ह्यातील रूग्ण वर्धेत उपचार घेत असल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचणीची जबाबदारी आहेच. केंद्राच्या निर्देशानुसार कुठल्याही रूग्णास दाखल करून घेणे अनिवार्य असल्याने दोन्ही कोविड रूग्णालय सज्ज ठेवावी लागत आहे.