बंगळूरुच्या संस्थेचा अहवाल; आरोग्याला धोका नाही

टोमॅटो पिकावर सहा विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे बंगळूरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हॉर्टिकल्चर  या संस्थेत केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. सर्व विषाणू हे वनस्पतीतील असल्याने मानवी आरोग्याला त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा निर्वाळा शास्त्रज्ञ डॉ रेड्डी यांनी दिला आहे.

संस्थेचे पीक रोग शास्त्रज्ञ डॉ. एम. के. रेड्डी यांनी टोमॅटोमध्ये कुकुंबर मोझॅक व अन्य पाच विषाणूजन्य रोग आढळून आले असल्याचे स्पष्ट केले. बियाणे, रोपवाटिकेपासून पिकाचे व्यवस्थापन काटेकोर व प्रभावी केल्यास या रोगांचे नियंत्रण शक्य आहे असे स्पष्ट केले.

देशात दीड ते दोन लाख हेक्टर क्षेत्रात, तर राज्यात सर्व हंगाम मिळून पन्नास हजार हेक्टरमध्ये पीक घेतले जाते. फेब्रुवारी व एप्रिलदरम्यान टोमॅटोची लागवड केली जाते. त्यावर यंदा विषाणूचा प्रादुर्भाव झाला. नगर जिल्ह्य़ातील अकोले व संगमनेर भागात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रातील टोमॅटोवर विषाणूचा प्रादुर्भाव झाला.