अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस १० वष्रे सक्तमजुरी व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा उमरगा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश स. ला. पठाण यांनी सुनावली. या प्रकरणी दोन सहआरोपींना ३ वष्रे सक्तमजुरी व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
लोहारा तालुक्यातील ही मुलगी १६ एप्रिल २०१२ ला संध्याकाळी सातच्या सुमारास घरी असताना शेजारी राहणाऱ्या कोमलबाई तानाजी कोनाळे (वय ३२) हिने तिला घराबाहेर बोलावले. दोघी गावालगत उसाच्या शेतात गेल्या. तेथे सुनील अप्पाशा लकडे (वय २२) व इस्माईल शहानूर मुल्ला (दोघे फणेपूर) हे दोघे थांबले होते. कोमलबाईने पीडित मुलीस लकडेसोबत जाण्यास सांगितले. त्यास तिने नकार देत ही बाब वडिलांना सांगण्याची धमकी दिल्यानंतर लकडेने तिला धरून उसाच्या शेतात नेले. कोमलबाई व इस्माईल या दोघांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. लकडेने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर ही मुलगी गरोदर असल्याचे मुलीच्या आईने रुग्णालयात तपासणी केल्यानंतर समोर आले. त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून १ ऑगस्ट २०१२ रोजी अत्याचार व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा नोंदविल्यानंतर पीडित मुलीस बालकाश्रमात पाठविले. तेथे तिने मुलीस जन्म दिला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपअधीक्षक पंजाब भगत यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयासमोर झालेल्या साक्षी व पुरावा ग्राह्य धरून आरोपींना वरीलप्रमाणे शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. व्ही. एस. आळंगे यांनी काम पाहिले.