सावंतवाडी : रोजगाराच्या निमित्ताने परप्रांतीय सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात स्थायीत होत आहेत. आणि स्थानिक रोजगारासाठी भटकत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. परप्रांतीयांनी जिल्ह्य़ातील सर्व लहान-मोठय़ा रोजगारावर आपला ताबा निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे विकासासाठी येणारा कोटय़वधी रुपयांचा निधी परप्रांतीयांना रोजगाराच्या निमित्ताने मिळत असल्याची चर्चा आहे.

जिल्ह्य़ात राजस्थान, केरळ, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, झारखंड अशा राज्यांतून परप्रांतीय कामगार मोठय़ा प्रमाणामध्ये आलेले आहेत.

उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेल्या परप्रांतीयांनी कणकवलीतील एका नदीवर छटपूजासारखा सण साजरा केला. दोडामार्ग तालुक्यात भेडशी भागात केरळी शेतकरी देखील आपला सण मोठय़ा उत्सवात साजरा करतात. परप्रांतीय सण साजरे करू लागले असताना स्थानिक जिल्हावासीयांना मात्र पारंपरिक सणांचा विसर पडत आहे.

परप्रांतातील सण जिल्हावासीयदेखील साजरे करू लागले आहेत हा एक चिंताजनक प्रश्न पारंपरिक व संस्कृतीच्या दृष्टीने निर्माण होण्याची भीती आहे.

केरळी लोक शेती व बेकरी राजस्थानी मिठाई दुकान, गुजराती स्वामील किंवा इमारती सामान, उत्तर प्रदेश बिहारमधील फíनचर कारागीर व छोटी मोठी कामे करत आहेत. कर्नाटकामधील ठेकेदार आणि इमारती-रस्त्यांची मोलमजुरीची कामे करत आहेत. जिल्ह्य़ात कोटय़वधी रुपयांचा निधी येतो त्या प्रकल्पाची कामे करण्यासाठी परप्रांतीय प्राधान्य देतात. काही अपवाद वगळता परप्रांतीयांना या कामावर जुंपले जाते. जिल्ह्य़ातील  ठेकेदारी व्यवसाय करणारे देखील आपल्या कामावर परप्रांतीयांना प्राधान्य देतात. इमारत बांधकाम व्यवसायात देखील परप्रांतीय कामगार लागतात.

जिल्ह्य़ात शेती बागायती, रस्ता कामे, इमारत कामे, बागायती सांभाळणे, मिठाईची दुकाने तसेच इमारती कामांना लागणारे सामान अशी दुकाने परप्रांतीयांनी थाटली आहेत.

जिल्ह्य़ातील प्रत्येक क्षेत्रांमध्ये परप्रांतीय कामगार कामास असतात. स्थानिक कामगारांना तेथे स्थान नाही. या प्रकारची अवघड कामे स्थानिकांना जमणार नाहीत ती परप्रांतीयांकडून करून घेतली जातात असे सांगण्यात येते. इमारतींना दरवाजे व अन्य फíनचरचे काम तसेच खिडक्यांचे काम देखील परप्रांतीय करतात. जिल्ह्य़ातील कारागीर मात्र या रोजगाराकडे फक्त पाहात बसले आहेत असे चित्र आहे त्यात ते झोकून देत नसल्याचे सांगण्यात येते.

जिल्ह्य़ात रोजगाराच्या निमित्ताने केरळ, राजस्थान, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड कर्नाटक अशा भागांतून तरुणांसह कुटुंबीयांचा भरणा वाढत आहे तर जिल्ह्य़ातील स्थानिक तरुणांसह कुटुंबीय मुंबई, पुणे, बेळगाव, गोवा, कोल्हापूर अशा भागांत नोकरी व  कामधंद्यासाठी जात आहेत. शेती, बागायतीत देखील केरळी लोकांनी बस्तान बसवले आहे.

जिल्ह्य़ात कोटय़वधी रुपयांच्या येणाऱ्या विकास निधीचे लाभार्थी परप्रांतीय कामगार ठरत आहेत आणि स्थानिक मात्र रोजगारासाठी जिल्ह्य़ाबाहेर भटकत आहे असे चित्र उभे राहिले आहे. राजकारण आणि समाजकारण करणाऱ्या नेत्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मुंबईत एकेकाळी शिवसेनेने ‘लुंगी हटाओ पुंगी बजाव’अशी घोषणा दिली होती आणि नंतरच्या काळात ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’ असे परप्रांतीयांचे धोरण राहिले आहे. आता मुंबईनंतर सिंधुदुर्ग जिल्हय़ासह कोकणात परप्रांतीय स्थायिक होत आहेत. त्यामुळे भविष्यात स्थानिक कोकणात टिकेल किंवा कसे, असा प्रश्न निर्माण होतो.

जिल्ह्य़ात परप्रांतीयांनी रोजगाराच्या निमित्ताने केलेली गर्दी पाहता स्थानिकांनी रोजगारासाठी जिल्ह्य़ाबाहेर भटकणे योग्य नाही, त्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन रोजगाराची संधी स्थानिक तरुणांना कुवतीप्रमाणे कशी मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे

कोकणावर देखील परप्रांतीय संस्कृतीचा पगडा निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे निसर्गसौंदर्य अबाधित राखण्यासाठी कोकणवासीयांनी पुढाकार घ्यायला हवा. कोकणपण टिकविताना निसर्गसौंदर्याची उधळण जोपासण्याचे काम कोकणवासीयांचे आहे तसेच पाणी साठय़ांचे जीवंतपणाचे रक्षण करण्याची गरज देखील आहे. कोकणाला लाभलेला पश्चिम घाट ( सह्य़ाद्री घाट ) आणि विस्तीर्ण सागरकिनाऱ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी निसर्गप्रेमी कोकणवासीयांनी आता जागृत राहायला हवे.

कोकणच्या निसर्गसौंदर्यावर फिदा होऊन रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीयांना रोखण्यासाठी कोकणासह जिल्ह्य़ातील जनतेने जागृत राहायला हवे असे बोलले जाते. कोकणामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मजुरीची कामे करणारे कामगार मिळत नसल्याने तोही एक चिंतेचा विषय आहे.