01 October 2020

News Flash

शिक्षणाचा गाडा घसरला

जिल्हा परिषदेच्या शाळांतील १ लाख ७० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

जिल्हा परिषदेच्या शाळांतील १ लाख ७० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

प्रसेनजीत इंगळे लोकसत्ता

विरार : करोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यात खासगी शाळांनी ऑनलाइन पद्धतीचा वापर करत दिलासा दिला आहे परंतु आजही जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.  जिल्ह्य़ात २१३१ शाळा असून त्यातील १ लाख ७० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.

देशभर सुरू असलेल्या करोनाचक्रामुळे अद्यापही शाळा सुरू झाल्या नाहीत आणि कधी सुरू होतील यात कोणतीही स्पष्टता नाही. यामुळे खासगी शाळांनी ऑनलाइन शिकवणी वर्ग सुरू करून शिक्षणाचा गाडा हाकायला सुरुवात केली आहे. पण त्यातही पालक आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याहून बिकट परिस्थिती जिल्हा परिषद शाळांची आहे. पालघर जिल्ह्य़ात २११३ जिल्हापरिषदेच्या शाळा आहेत त्यात १ लाख ७० हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण या विद्यार्थ्यांना अजूनही त्यांच्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात कधी आणि अशी होणार याची कोणतीही माहिती नाही.

जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण घेणाऱ्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. करोना काळात अनेकांचे हाताचे काम गेल्याने ती अधिक गंभीर झाली आहे. यामुळे जरी ऑनलाइन शिकवणीचे घाट घातले तरी साधनाची उपलब्धता नसल्याने अनेकांना आपल्या शिक्षणाला राम राम ठोकावा लागणार आहे. सध्या काही मजुरी करणारे पालक या विद्यार्थ्यांना कामावर घेऊन जात आहेत. अनेक ठिकाणी मोलमजुरीची कामे आता हे विद्यार्थी करत आहेत. कारण शाळा सुरू नाहीत आणि घराची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असल्याने पालकांना मुलांनासुद्धा कामाला जुंपावे लागत आहे. कारण भुकेचा प्रश्न हा शिक्षणापेक्षा मोठा असल्याने मुलांनासुद्धा कामावर पाठवावे लागत असल्याची खंत बारकू धावडा या पालकाने केली आहे.

नुकताच वसई पंचायत समिती यांनी विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत असल्याचा एक अहवाल पाठवला आहे. यात खासगी आणि जिल्हा परिषद शाळेतील ६ लाख ४७ हजार ९४९ जवळपास विद्यार्थी सध्या  दूरचित्रवाणी, रेडिओ, संगणक, मोबाइलवरून शिक्षण घेत असल्याचे सांगितले आहे.

या अहवालानुसार दूरचित्रवाणीवरून १२ हजार ५७६ विद्यार्थी, रेडिओवरून १० हजार ५८६ ,      संगणकाद्वारे ६ हजार ७८० तर  मोबाइल डेटावरून केवळ १२४० विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. विशेष म्हणजे ही आकडेवारी पालकांनी दिली असल्याचा दावा वसई पंचायत समिती यांनी केला आहे. पण मुळात अद्याप कोणतेही शिक्षण वर्ग सुरू झाले नाहीत. काही शिक्षक शाळा बंद पडू नये म्हणून स्वत:च्या खर्चाने काही विद्यार्थी पालकांशी  संपर्क साधत असल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी माधवी तांडेल यांनी दिली आहे. पण अजूनही शासनाचे शैक्षणिक धोरण ठरले नसल्याने विद्यार्थ्यांना शिकवणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संगणक आणि इंटरनेट सुविधांचा अभाव

सध्या वसईतील जिल्हा परिषद शाळांचा अहवाल पाहता हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या शाळेत संगणक आणि इंटरनेटची सुविधा आहेत. त्यातही पालक तर ६० टक्केहून अधिक पालकांकडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल नाहीत, आदिवासी दुर्गम भागात २४ तास वीज सुविधा नाहीत. तर काही भागांत मोबाइलवर नेटवर्क मिळत नाहीत. अनेक पालक टाळेबंदीत काम नसल्याने स्थलांतरित झाले आहेत. तर काही भागांत अनेक घरांत टीव्ही नाही. शासनाकडून साधने उपलब्ध करून दिली जात नाहीत. यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीत हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.

शासनाने ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा घाट घातला तरी, मूलभूत सुविधांसाठी झगडणारे पालक ऑनलाइन शिक्षणासाठी साधने कुठून आणणार. यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. शासनाने आधी सुविधा निर्माण कराव्यात आणि नंतर पद्धतीचा अवलंब करावा.

– विवेक पंडित, अध्यक्ष, श्रमजीवी संघटना.

अद्याप शासनाकडून कोणतेही आदेश आले नाहीत, तसेच कोणतेही साहित्य उपलब्ध झाले नाहीत. शिक्षक स्वत:च्या खर्चातून काही शिकवणी वर्ग घेत आहेत,  शासनाशी पाठपुरावा सुरू आहे, शासन आदेशानुसार पुढील धोरणे ठरविली जातील.

 – माधव मद्ये, शिक्षण विस्तार अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 1:19 am

Web Title: over 1 lakh 70 thousand students in zilla parishad schools deprived of education zws 70
Next Stories
1 खडतर प्रवास सुरूच..
2 जिल्हा परिषदेमधील वाद विकोपाला
3 इंटरनेट नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रथम वर्ष प्रवेशापासून वंचित
Just Now!
X