संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यालाही अद्याप करोना विषाणूचा विळखा कायम आहे. अनलॉकच्या माध्यमातून राज्य शासन अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या राज्यात गणेशोत्सवाचं वातावरण आहे. करोनाचे नियम पाळत सर्व ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. राज्यात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होतच आहे. मंगळवारी राज्यात १० हजार ४२५ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

एकीकडे राज्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढत असली तरीही रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. मंगळवारी नव्याने आढळलेल्या रुग्णांपेक्षा जास्त म्हणजेच १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत करोनावर मात करुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ५ लाखांच्या वर केली असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७३.१४ टक्क्यांवर आलं आहे.

आजच्या दिवशी ३२९ रुग्णांना करोनाशी लढताना आपले प्राण गमवावे लागले आहेत. करोनाच्या प्रादूर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार व सर्व महापालिका यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासारख्या महत्वाच्या शहरांत अजुनही अजुनही नवीन करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.