11 December 2019

News Flash

लाखो हेक्टर शेती पाण्यात

६६४० घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली असून ४९ हजार घरांचे कमीअधिक प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुराच्या विळख्यातून बाहेर पडल्यानंतर सांगलीत सुरू झालेली नागरी साफसफाई.

दीड लाख घरांची आणि १३ हजार किमी रस्त्यांचीही दुर्दशा

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्य़ात गेल्या आठवडय़ात ओढवलेल्या पूरसंकटात सुमारे साडेचार लाख हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त झाली आहे. सुमारे दीड लाख घरांना फटका बसला असून १३ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने मंगळवारी देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हानीच्या व्याप्तीचा आढावा घेण्यात आला.  राज्यात ऑगस्टच्या प्रारंभापासून सुरू झालेल्या पावसामुळे काही भागांत मोठय़ा प्रमाणावर हानी झाली आहे. कोल्हापूर- सांगली जिल्ह्य़ात तब्बल ४ लाख ५५ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून जिल्हा परिषदेच्या ११ हजार किमी तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २१०० किमी  लांबीच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. एक लाख ३९ हजार घरांचे १२८ कोटींचे नुकसान झाले आहे. ६६४० घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली असून ४९ हजार घरांचे कमीअधिक प्रमाणात नुकसान झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी ४७०८ कोटी तर कोकण, नाशिक आणि इतर आपदग्रस्त जिल्ह्यांसाठी २१०५ कोटींची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षणानंतर यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्त करण्यात आली असून याबाबतचे पुढील निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्यात आला असून त्यानुसार केंद्राकडे मागणी करावयाच्या आर्थिक मदतीचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनात दोन भाग असून पहिल्या भागात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील नुकसानीपोटी तर दुसऱ्या भागात कोकण, नाशिक आणि इतर जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागातील नुकसानीपोटी मागावयाच्या मदतीचा समावेश आहे.

अतिवृष्टी वा वारंवार पूर येणाऱ्या भागांतील लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे.

दुकानदारांना मदत

या पुरात अनेक बाजारपेठांत पाणी शिरून किरकोळ दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. ही बाब लक्षात घेऊन छोटय़ा व्यावसायिकांनाही प्रथमच  नुकसानीच्या ७५ टक्के किंवा किमान ५० हजार  रूपयांपर्यत मदत करण्यात येणार आहे.

सहा हजार कोटींची केंद्राकडे मागणी

पूरग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसनासाठी ६ हजार ८१३ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. केंद्राची मदत येईपर्यंत राज्याच्या निधीतून पूरग्रस्तांना मदत करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

केंद्राकडे मागितलेली मदत

(आकडे कोटी रुपयांमध्ये)

’पीकहानी                                     २०८८

’रस्ते आणि पूलदुरुस्ती                 ८७६

’पूरग्रस्त                                       ३००

’छोटे व्यावसायिक                         ३००

’घरदुरुस्ती                                     २२२

’सिंचन आणि जलसंपदा                 १६८

’शाळा आणि पाणी पुरवठा योजना   १२५

’आरोग्य                                            ७५

’स्वच्छता                                        ७०

’पशुधनहानी                                    ३०

’निवारा केंद्रे                                     २७

’मदतकार्य                                       २५

’मत्स्य व्यवसाय                             ११

First Published on August 14, 2019 6:02 am

Web Title: over one lakh hectares farmland destroyed in floods in kolhapur and sangli zws 70
Just Now!
X