‘धरतीधन’च्या संचालकाविरुद्ध १५ गुन्हे

यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील ‘धरतीधन’ बीज प्रक्रिया केंद्रावर तीन पथकांनी संयुक्त कारवाई करून बोगस बियाण्यांचा चार कोटी १९ लाख रुपयांचा साठा व ट्रक जप्त केला. याप्रकरणी युनिटचे संचालक संजय सोहनलाल मालानी याच्यावर दारव्हा पोलिसांनी विविध कलमान्वये १५ गुन्हे दाखल केले. यावरून खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे दिसते.

खरीप हंगामापूर्वी अनेक बोगस कंपन्यांनी बियाणे विक्रीसाठी आणल्याची शक्यता व्यक्त होत होती. बोरी अरब येथे अवैध बियाणे पॅकिंगचा कारखानाच उघडकीस आल्याने या फसवणुकीच्या प्रकारास पुष्टी मिळाली आहे. धरतीधन बीज प्रक्रिया केंद्रावर पुणे, अमरावती आणि यवतमाळच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई केली. यात बियाण्यांचा चार कोटी १९ लाख रुपयांचा साठा सापडला. याप्रकरणी कृषी अधिकारी राजीव शिंदे आणि तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांनी धरतीधनचा संचालक संजय सोहनलाल मालानी याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

कारवाईवेळी ३० किलोच्या बॅगमध्ये सोयाबीन बियाणे भरले जात होते. या बॅगेवर उत्पादक, प्रक्रिया व विपणन कर्ता, कंपनीचे नाव, पत्ता, उगवणशक्ती, भौतिक शुद्धता, बियाणे तपासणी दिनांक याचीही नोंद नव्हती. उपलब्ध साठा, केलेली विक्री, त्याची देयके, बीजोत्पादन, बीजोत्पादक शेतकरी, यासह अनेक विषयांची माहिती कंपनीने पथकाला दिली. कुठलेही दस्तावेज कंपनीकडे नव्हते. यामुळे कंपनीने आर्थिक फायद्यासाठी शासन व शेतकऱ्यांचीही दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बियाणे कायदा १९६८, बीज अधिनियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, भारतीय दंड संहिता १८६० नुसार विविध १५ कलमान्वये संजय मालानी याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र तो फरार असून यानंतर कृषी विभागाने जिल्ह्य़ात अलर्ट जाहीर केला. कारवाईत जप्त बियाणे जिल्ह्य़ात कुठे वापरात आले याचा शोध घेण्यात येत आहेत. दोन वर्षांपूर्वी कळंब येथेही असाच प्रकार उघडकीस आला होता.