जिल्ह्य़ात शुक्रवारी दुपापर्यंत एकूण करोनाबाधितांची संक्या २ हजार १७३ झाली. यापैकी १ हजार ४०० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्य़ात आतापर्यंत ६८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.
सध्या जिल्ह्य़ात विविध ठिकाणी संस्थात्मक अलगीकरणात ५७३ व्यक्ती आहेत.
शुक्रवारी दुपापर्यंत जिल्ह्यात १० हजार १५४ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. टाळेबंदी टप्प्पानिहाय उघडणे आणि निर्बंथाची सुलभता यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांना अनुसरून जिल्ह्य़ातील प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत वाढविला आहे.
प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल जालना जिल्ह्य़ात मागील चार महिन्यांत दोनशे व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जिल्ह्य़ात ठिकठिकाणी ८८० वाहने जप्त केली आहेत. टाळेबंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल आतापर्यंत दीड हजारांपेक्षा अधिक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
नियमांचा भंग केल्याबद्दल वाहनचालकांना ८ लाख ८० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
मुखपट्टी नसणाऱ्यांना दंड
सार्वजनिक ठिकामी मुखपट्टय़ांचा वापर केला नाही तसेच शारीरिक अंतर ठेवले नाही म्हणून जिल्ह्य़ात दोन दिवसात २ हजार ३५४ व्यक्तींच्या विरुद्ध जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने दंडात्मक कारवाई केली आहे. या व्यक्तींकडून ५ लाख १५ हजार रुपयांपेक्षा अधिक दंडाची वसुली करण्यात आली आहे.
जुलै महिन्यात उद्रेक
जुलै महिन्यात करोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. प्रामुख्याने जालना शहरात दररोज रुग्णांमध्ये वाढ होत गेली. जुलै महिन्यात १ हजार ६१९ रुग्ण आढळून आले. जिल्ह्य़ात आतापर्यंत आढळलेल्या करोनाबाधितांपैकी ७५ टक्के रुग्ण जुलै महिन्यात आढळले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 1, 2020 12:11 am