News Flash

कांद्याच्या साठवणुकीतून महागाईवर मात

वाडा तालुक्यात दर वर्षी मे महिन्यामध्ये कुडुस येथे मोठय़ा प्रमाणात वार्षिक बाजार भरतो.

(संग्रहित छायाचित्र)

|| रमेश पाटील

गेले अनेक वर्षे पावसाळ्यात व त्यानंतर सर्रास कांद्याचे दर किलोमागे पन्नासच्या पुढे जात आहेत. कांद्याच्या वाढलेल्या दराचा फटका शहरातील  गृहिणींना बसत असला तरी ग्रामीण भागातील गृहिणींवर त्याचा कोणताच परिणाम जाणवत नाही. कांद्याची योग्य साठवण हा त्या मागचा उपाय त्यांना सापडल्याने या गृहिणी निर्धास्त आहेत.

वाडा तालुक्यात दर वर्षी मे महिन्यामध्ये कुडुस येथे मोठय़ा प्रमाणात वार्षिक बाजार भरतो. या बाजारात वाडा, शहापूर, भिवंडी व विक्रमगड तालुक्यातील हजारो शेतकरी व या परिसरात वास्तव्य करणारे नागरिक या बाजारातून पाच ते सहा महिने पुरेल एवढय़ा प्रमाणात कांदा, लसून, खोबरे अशा अनेक टिकाऊ वस्तूंची खरेदी करून त्याची योग्य प्रकारे साठवणूक करतात.

कुडुस येथे मे महिन्यामध्ये अवघ्या पंधरा दिवसांसाठी भरत असलेल्या या  बाजारातून (उरुस) ४० ते ५० हजार मेट्रिक टन कांद्याची विक्री होत असते. या परिसरातील चार तालुक्यांतून आलेले ग्राहक १०० ते २०० किलोपर्यंत कांदा खरेदी करून आपल्या मोकळ्या घरामध्ये त्याची योग्य प्रकारे साठवणूक करतात.

मे महिन्यात साठवणूक केलेला हा कांदा डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत वापरला जात असल्याने पावसाळ्यात व त्यानंतर वाढलेल्या कांद्याच्या दराची झळ ग्रामीण भागातील महिलांना बसत नाही. सध्या वाडा व कुडूस येथील बाजारपेठेत कांदा ६० ते ७० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.

मात्र या परिसरातील बहुतांशी कुटुंबीयांनी पावसाळ्यापूर्वीच आठ ते १० रुपये किलो या दराने कांदा खरेदी करून त्याची साठवणूक केली असल्याने वाढलेल्या दराचा या गृहिणींवर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही.

आम्ही दर वर्षी पावसाळ्यापूर्वी दीड ते दोन क्विंटल कांदे घरगुती वापरासाठी विकत घेतो. त्याची योग्य प्रकारे साठवणूक करीत असल्याने ते सहा ते सात महिने  व्यवस्थित राहतात. कांदे साठवणीमुळे चार ते पाच हजाराची बचत होते.

– गायत्री गौतम पाटील, गृहिणी, सांगे, ता.वाडा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 1:20 am

Web Title: overcoming onion storage akp 94
Next Stories
1 मासेमारी बोटीला जहाजाची धडक
2 बँका बंद होत असल्याच्या अफवेने संभ्रम
3 मालमत्तेत वाढ, शिक्षणात मात्र घट
Just Now!
X