News Flash

मालेगावात ओवेसींची सभा घेण्याचे पुन्हा प्रयत्न

हैदराबादेतील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलिमीन (ए.आय एम.आय.एम.) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या

| September 15, 2013 02:41 am

हैदराबादेतील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलिमीन (ए.आय एम.आय.एम.) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेले खासदार असरूद्दिन ओवेसी यांची येत्या २७ सप्टेंबर रोजी मालेगावात जाहीर सभा घेण्याचे प्रयत्न त्यांच्या समर्थकांकरवी पुन्हा सुरू झाले आहेत.
या आधी गेल्या १४ जून रोजी येथे ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या या शहरात त्यांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्यास कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, या भीतीपोटी राज्याच्या गृह मंत्रालयातर्फे तेव्हा केवळ त्यांच्या सभेलाच परवानगी नाकारली गेली नव्हती तर महिनाभरासाठी त्यांना शहरात प्रवेशबंदी देखील करण्यात आली होती. त्यामुळे तेव्हा ही सभा होऊ शकली नाही. आता मात्र त्यांच्या समर्थकांनी पुन्हा अशी सभा घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत. येथील अन्सार जमातखान्यात ही सभा घेण्याचा या समर्थकांचा मानस आहे.
शहरात या पक्षाच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्याचा समर्थकांचा पक्का समज असल्याने त्याद्दष्टिने कामकाज सुरू करण्यात आल्याचे चित्र आहे. त्यासाठी रिजवान बॅटरीवाला यांची पक्षाच्या शहर निमंत्रकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय पक्षातर्फे अन्य पाच जणांचा समावेश असलेली समन्वयक समिती गठित करण्यात आली आहे. बॅटरीवाला व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन पक्षाची ध्येय धोरणे स्पष्ट करून पक्षवाढीसाठी आगामी काळात हाती घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. आमचा पक्ष केवळ विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नसून समाजातील सर्वच दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देणे तसेच सर्वानाच सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करत पक्ष जातीयवादी असल्याचा निव्वळ अपप्रचार करण्यात येत आहे, अशी टीका बॅटरीवाला व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 2:41 am

Web Title: owaisi supporter tries to conduct public rally in malegaon again
Next Stories
1 महिंद्राची कामगारांना ९४०० रुपये वेतनवाढ
2 खोडदमधील महादुर्बिणीच्या पहिल्या टप्प्याचे उद्या उद्घाटन
3 येरवडा कारागृहात मोबाइल सापडला
Just Now!
X