जिल्हा आरोग्य विभागाचा उपक्रम; नागरिकांच्या गृहविलगीकरणाच्या पसंतीमुळे केंद्र रिकामे

पालघर : पालघर जिल्ह्यात असलेल्या २० करोना काळजी केंद्रांमध्ये रुग्णांची उपस्थिती कमी झाली असून या पैकी काही केंद्रांमध्ये प्राणवायू खाटांचा समावेश करून त्यांना करोना उपचार केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचे जिल्हा आरोग्य विभागाने उपक्रम हाती घेतला आहे. वाणगाव ग्रामीण रुग्णालयाचे करोना उपचार केंद्रामध्ये रूपांतर करून त्याची सुरुवात करण्यात आली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिकतर नागरिकांनी गृहविलगीकरणात राहाणे पसंत केले असताना शासनाने उभारलेल्या करोना काळजी केंद्रांमधील व्यवस्था पूर्ण क्षमतेने वापरली गेली नसल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील २० करोना काळजी केंद्रामध्ये २३०० विलगीकरण खाटा असून लक्षण नसणाऱ्या किंवा सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांना काळजी केंद्रात दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

एप्रिल महिन्यात करोना रुग्णांच्या उच्चतम वाढीदरम्यानदेखील या काळजी केंद्रातील तत्कालीन १८९० खाटांपैकी जेमतेम ८०० ते ९०० (६० ते ६५ टक्के) रुग्ण दाखल झाले असल्याचे दिसून आले होते. रुग्णांचा वाढता आलेख पाहता अनेक ठिकाणी नवनवीन करोना काळजी केंद्र स्थापन करण्याचे प्रयत्न झाले असून सफाळा (५० खाटा), बेटेगाव (१५० खाटा), आशागड (१०० खाटा), धुंदलवाडी (५० खाटा) तसेच जव्हार युनिव्हर्सल इंग्रजी शाळा (२०० खाटा) येथील करोना काळजी केंद्रांमध्ये खूप कमी संख्येने रुग्ण दाखल झाल्याचे दिसून आले.  त्यामुळे या केंद्रांचा उपचार केंद्रांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येते.

सध्या जिल्ह्यातील प्राणवायूची मागणी वाढत आहे. आता काही पोलाद उद्योगांकडून प्राणवायूपुरवठा होऊ लागला आहे. नवीन प्राणवायू उत्पादन प्रकल्पदेखील हाती घेतले जात आहेत. त्यामुळे मागणीच्या दृष्टीने  करोना काळजी केंद्रांना करोना उपचार केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले. वाणगाव ग्रामीण रुग्णालयाचे करोना उपचार केंद्रामध्ये रूपांतर झाले असून आगामी काळात साखरी (मोखाडा), पोशेरी (वाडा) येथील काळजी केंद्रांचे आगामी काळात रूपांतर करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागांत पालघर पॅटर्नउपयुक्त

करोना संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी  ग्रामीण भागात  ‘पालघर उपचार पॅटर्न’ सुरू करण्यात आला आहे. त्याचा रुग्णांना लाभ होत आहे. यामध्ये ज्या ठिकाणी करोनाचे संक्रमण मोठय़ा प्रमाणात आहे तेथील आरोग्य संस्थांमध्ये विशिष्ट वेळेत ताप निदान केंद्र (फिवर क्लिनिक) सुरू  करण्यात आले आहे. त्या ठिकाणी प्रतिजन चाचणी करण्याची व्यवस्था सुरू आहे.  या खेरीज जिल्ह्यातील २४  रेस्क्यू वाहनांमधील आरोग्य पथकाद्वारे वेगवेगळ्या उपकेंद्रांना भेटी देऊन संशयित रुग्णांची प्रतिजन चाचणी करणे, संसर्ग झालेल्या रुग्णांना औषध वितरित करणे तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.  ज्या बाधितांना सौम्य लक्षण किंवा लक्षणे नाहीत अशा रुग्णांना गावामध्ये असलेल्या शाळांमध्ये विलगीकरणात ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्यांना घरचे जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. त्यांना आशा सेविका, तज्ज्ञांकडून देखरेख व मार्गदर्शन मिळत आहे.  रुग्णांना महागडय़ा विषाणूचा फैलाव रोखणाऱ्या गोळ्या (अँटी वायरल) मोफत दिल्या जातात. तसेच आवश्यकता भासल्यास प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर व सिलिंडरच्या माध्यमातून प्राणवायूपुरवठा केला जात आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.