संदीप आचार्य, लोकसत्ता

राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून करोना रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा आगामी काळात कसा करायचा? हे एक आव्हान बनले आहे. करोना रुग्णांना सध्या दररोज ७७७ मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन लागत असून पुढील दोन आठवड्यात वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील ऑक्सिजनचा साठा अपुरा ठरणार आहे. परिणामी जादा ऑक्सिजन साठा उपलब्ध करून देण्याकरता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला विनंती करण्यात आली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात राज्यात वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून १०८० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन केले जात होते. तेव्हा करोना रुग्णांना साधारण रोज ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता. ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेऊन ऑक्सिजनच्या एकूण उत्पादनातील ८० टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय तर २० टक्के औद्योगिक वापरासाठी देता येईल, असे आदेश शासनाने जारी केले होते.

ऑक्सिजन वापरासाठी मार्गदर्शक तत्वे!

सप्टेंबरमध्ये आरोग्य विभागाने घेतलेल्या ऑक्सिजन वापराच्या आढाव्यात खाजगी रुग्णालयात १५ हजार रुग्णांसाठी ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होत असल्याचे तर त्याचवेळी शासकीय रुग्णालयात १५ हजार रुग्णांसाठी २०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर झाल्याचे आढळून आले. त्यानंतर आरोग्य विभागाने कोणत्या रुग्णांसाठी किती ऑक्सिजन वापरावा याची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. त्यानंतर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानेही करोना रुग्णांसाठी ऑक्सिजन वापराबाबत मार्गदर्शक तत्व जाहीर करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले होते.

ऑक्सिजनची आकडेवारी…

सप्टेंबर २०२० मध्ये राज्यात एकूण ५६ हजार २९७ ऑक्सिजन खाटा उपलब्ध होत्या. आता करोनाची दुसरी लाट आली असून राज्यात तब्बल ६२ हजार ३०४ ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. आजच्या दिवशी १७ हजार ३१७ रुग्ण या ऑक्सिजन खाटांवर उपचार घेत आहेत. हे प्रमाण एकूण खाटांच्या २७.७९ टक्के असून येत्या पंधरा दिवसात यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राज्यात सध्या ११०० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत असून यातील करोना रुग्णांसाठीचा वापर ७७७ मेट्रिक टन प्रतिदिन एवढा आहे. राज्यात एकूण ६५ ऑक्सिजन भरणा केंद्र असून राज्यात ऑक्सिजन साठवणूक करणाऱ्या विविध टँकची क्षमता ७००० मेट्रिक टन साठवणुकीची आहे. आरोग्य विभागाअंतर्गत शासकीय व पालिका रुग्णालयात मिळून १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन साठवणूक क्षमता आहे. मात्र राज्यातील विविध कंपन्यांची ऑक्सिजन उत्पादन क्षमता ११०० मेट्रिक टन व रोजचा वापर ७७७ मेट्रिक टन वापर लक्षात घेता आता अन्य राज्यांकडून ऑक्सिजन पुरवठा मिळणे गरजेचे आहे असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. आरोग्य विभागाकडून केंद्र सरकारकडे ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी करण्यात आली असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

आठवड्याचा लॉकडाउन परिणामकारक नाही; केंद्राने महाराष्ट्राला दिला होता सल्ला

सप्टेंबर २०२० मध्ये ऑक्सिजनचा होणारा अतिरिक्त वापर तसेच गळती याची माहिती घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरीय समिती नियुक्त केली होती. तेव्हा प्रत्येक महसुली विभागात ५० ड्युरा सिलिंडर व २०० जम्बो सिलिंडरचा राखीव साठा ठेवण्यास विभागीय आयुक्तांना सांगितले होते. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन वापराची माहिती गोळा करण्याबरोबरच ऑक्सिजनची गळती वा अन्य कोणत्या कारणांमुळे ऑक्सिजन वाया जात नाही ना, याची काटेकोर काळजी घेण्यास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले होते.

आता सर्व रुग्णालयात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार करोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा वापर होत असला तरी वाढत्या रुग्णसंख्येला राज्यातील ऑक्सिजनचा साठा पुरेसा पडणार नाही. आताच ऑक्सिजनची परिस्थिती चिंताजनक बनली असल्याने अन्य राज्यांकडून ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात आली आहे.