News Flash

Oxygen Shortage: राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहे – राजेश टोपे

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ लागली असताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केंद्र सरकारला विनंती केली आहे.

संग्रहीत फोटो

देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना अनेक भागांमधून तशा तक्रारी येऊ लागल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे रुग्णांचे जीव जाण्यासारख्या दुर्दैवी घटना देखील घडल्या असताना महाराष्ट्रात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचे प्राण गेल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थेट केंद्र सरकारला साकडं घातलं आहे. “राज्य सराकर सर्व प्रकारे अक्षरश: नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायला तयार आहे. राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे. ऑक्सिजनच्या संदर्भात आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर किंवा ऑक्सिजन निर्माण होणाऱ्या प्लांटवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. उद्योगधंद्यांमध्ये देखील पीएसए टेक्नोलॉजीचे प्लांट आहेत. त्यांचा देखील आपण वापर करू शकतो का? याची चाचपणी सुरू आहे”, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले. “ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन जनरेटर्स हे सध्या आपल्याकडे उपाय आहेत. केंद्राकडे देखील आपण मदतीचा हात मागत आहोत”, असं देखील ते म्हणाले आहेत.

“भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला उद्विग्न सल्ला!

नाशिकमध्ये काय घडलं?

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये बुधवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन लीक झाला. जवळपास एक ते दीड तास ही गळती सुरू होती. स्थानिक प्रशासन आणि तंत्रज्ञांनी मिळून ही गळती रोखली खरी. मात्र, त्यामुळे वर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. यामध्ये २४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याचं भीषण रुप समोर आलं. राज्यातल्या इतरही काही भागांमध्ये ऑक्सिजन तुटवड्याच्या तक्रारी समोर आल्या असून तातडीने ऑक्सिजन पुरवण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

दरम्यान, “केंद्र सराकारकडून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू असून ती जर तातडीने झाली, तर त्याचा आपल्याला आधार मिळू शकतो. समुद्र किनाऱ्यावरचं राज्य म्हणून त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो”, असं देखील राजेश टोपे यावेळी म्हणाले. “ही अतिशय कठीण परिस्थिती आहे. आपण सगळ्यांनी अत्यंत जबाबदारीने वागावं आणि आपण सगळ्यांनी साथ द्यावी”, अशी विनंती देखील राजेश टोपेंनी राज्यातील नागरिकांना आणि वैद्यकीय क्षेत्रातील आरोग्य सेवकांना केली आहे. त्यामुळे एकीकडे राज्यात दिवसेंदिवस करोनाबाधितांचं आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ही एक मोठी समस्या सध्या राज्यासमोर आणि संपूर्ण देशामोर उभी राहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 11:00 am

Web Title: oxygen supply shortage in maharashtra rajesh tope appeals central government pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 “…तर महाराष्ट्रात संकट निर्माण होईल”; नवाब मलिकांनी व्यक्त केली भीती
2 ठाकरे सरकारकडून राज्यात नवी नियमावली; जाणून घ्या काय सुरु, काय बंद?
3 “मोदींनी छगन भुजबळांपेक्षा वेगळं काय सांगितलं?”; शिवसेनेकडून सडकून टीका
Just Now!
X