करोनाच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्रात थैमान घातलं असून, रुग्णालयातील दुर्घटनांची मालिकाही सुरूच आहे. नागपूर, मुंबईतील दुर्घटनेनंतर नाशिकमधील दुर्घटनेनं महाराष्ट्राला धक्का बसला आहे. महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने २२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गळती लागल्याने ऑक्सिजन प्रेशर कमी झाला आणि ही दुर्घटना घडली. या घटनेबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली असून, मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत देणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे नाशिककडे रवाना झाले. त्यापूर्वी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी टोपे म्हणाले,”ही घटना दुर्दैवी आहे. मी नाशिकच्या महापालिका आयुक्तांशी मी बोललो आहे. त्यांनी घटनेची माहिती दिली असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं त्यांनी सांगितलं. मी नाशिकला जात असून, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे अगोदरच घटनास्थळी गेले आहेत,” असंही टोपे म्हणाले.

“महानगरपालिके हे कोविड हॉस्पिटल आहे. १५७ रुग्ण दाखल आहेत. ६१ रुग्ण हे चिंताजनक होते, म्हणजे त्यांना व्हेटिलेटर्स आणि ऑक्सिजनची गरज होती. त्यात लिक्विड स्टोरेज टँकला लिकेज झालं. हाय प्रेशरमुळे वेल्डिंग करण अवघड असतं. पण सुदैवाने तिथे एजन्सीचे लोक असल्यानं पुढची घटना टळली. पण, ही घटना दुर्दैवी आहे. याबाबत आयुक्तांना बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनाही घटनेची सर्व माहिती दिली आहे. ११ महिला आणि ११ पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे. तांत्रिक कारणामुळे ही घटना घडली आहे. याची सखोल चौकशी केली जाईल. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने मदत केली जाईल. अशा घटना पुढे कधीच घडू नये यासासाठी लिक्विड ऑक्सिजनमधील जे तज्ज्ञ लोक आहेत. त्यांच्याकडून यासाठी एसओपी तायर केली जाईल,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.