X

अडथळे पार करत पोहोचलेल्या प्राणवायूच्या टँकरने रुग्णांना जीवनदान!

अडथळे पार करीत टँकरने रुग्णांना जीवदान दिले.

नगर : शहरातील खासगी रुग्णालयातील प्राणवायूचा साठा संपुष्टात येण्याचा आणीबाणीचा प्रसंग ओढावलेला असतानाच, मंगळवारी जिल्हा प्रशासनाने प्रचंड धावाधाव करत मिळवलेला प्राणवायूचा टँकर चाकण (पुणे) येथून नगर शहरात पोहोचेपर्यंत मध्यरात्री अनेक अडथळ्यांची शर्यत या टँकरला पार करावी लागली. प्रत्येक अडथळ्यात रुग्ण, डॉक्टर, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी या सर्वांचे जीव टांगणीला लागले होते. परंतु हे अडथळे पार करीत टँकरने रुग्णांना जीवदान दिले. यासाठी अनेकांचे मदतीचा हात अडथळे दूर करण्यासाठी पुढे आले.

शहरातील अनेक रुग्णालयांतील प्राणवायूचा साठा काल, मंगळवारी अवघ्या काही तासांत पुरता शिल्लक राहिला होता (अद्यापि या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही). दिवसभर रुग्णालयातील डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत ही बाब निदर्शनास आणून दिली. वेळेत प्राणवायू उपलब्ध न झाल्यास अनेक रुग्णांना त्याचा धोका निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा प्रशासनाने पुणे येथील उत्पादक कंपनीकडून दोन टँकर (२९ केएल) आगाऊ नोंदणी त्यापूर्वीच केली होती. एक टँकर प्राणवायूची निर्मिती करणाऱ्या नगर एमआयडीसीतील कारखान्यात जाणार होता तर दुसरा टँकर जिल्हा सरकारी रुग्णालय व खासगी रुग्णालयासाठी उपलब्ध करण्यात आला होता. रुग्णालयांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या टँकरलाच अडथळे पार करावे लागले.

रुग्णालयासाठी पाठवलेला टँकर रात्री रांजणगावजवळ आरटीओ व काही डॉक्टरांनी अडवला. हा टँकर पुण्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे टँकर जागेवरच थांबून होता. ही बाब जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना समजल्यानंतर त्यांनी महसूलमंत्री, विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला. वरिष्ठ पातळीवर झालेल्या प्रयत्नातून कसाबसा हा टँकर नगरकडे निघाला.

शहरातील दिल्ली गेटकडून हा टँकर जिल्हा सरकारी रुग्णालयाकडे जात असताना हुतात्मा स्मारकासमोर, मध्यरात्री २ च्या सुमारास रस्त्यातच बंद पडल्याने सर्वांचीच त्रेधा उडाली. माहिती मिळताच शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी वैभव ढाकणे, साहेबान जहागीरदार, माजी नगरसेवक विपुल शेटीया, तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मेढे व त्यांचे सहकारी तातडीने मदतीला घटनास्थळी धावले.

त्यांनी टँकरला धक्का देऊन घेऊन जाण्यासाठी मध्यरात्री जेसीबी उपलब्ध केला. मात्र टँकरचे वजन २० टनपेक्षा अधिक असल्याने वाहन चालू करण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांना  फोन लावला असता कोणीही फोन उचलला नाही. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या बिकट प्रसंगाची माहिती आमदार संग्राम जगताप यांना फोनवर दिली. पदाधिकारी व पोलीसांनी सर्जेपुरातील एका मेकॅनिकचे दुकान उघडून टँकरच्या दुरुस्तीसाठी लागणारे आवश्यक साहित्य उपलब्ध केले. तसेच त्या मेकॅनिकला घेऊन बंद पडलेल्या टँकरकडे आणले.

बंद पडलेला टँकर सुरू झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. नंतर हा टँकर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. तेथेच त्याचे जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयांना वाटप करण्यात आले त्यामुळे टांगणीला लागलेला जीव भांडय़ात पडला.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी व तोफखाना पोलिसांच्या मदतीने अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले. हा टँकर चालू नसता झाला किंवा वेळेत दुरुस्त झाला नसता तर शहरात प्राणवायूचा टँकर येऊनही अनेक रुग्णांना त्याअभावी जीव गमवावा लागला असता. दुसरीकडे प्रशासनाचे जबाबदार अधिकारी झोपेत असल्याने फोन उचलण्यास तयार नव्हते. या संकटकाळात प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी सतर्क राहून जबाबदारी सांभाळण्याची गरज आहे.

 – वैभव ढाकणे, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

20
READ IN APP
X