राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी राजकीय संदिग्धता संपुष्टात आणत अखेर गुरुवारी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नव्या राजकीय प्रवासामुळे पुन्हा एकदा त्यांचे चिन्ह बदलेल. शिवाय जिल्हय़ातही भविष्यात नव्या राजकीय मोर्चेबांधणीला प्रारंभ होईल.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईत झालेल्या मेळाव्यात पाचपुते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यासाठी गेले महिनाभर ते ताटकळले होते. भाजप प्रवेशासाठी त्यांना चांगलीच प्रतीक्षा करावी लागली. त्यांच्या श्रीगोंदे मतदारसंघातील भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाचपुते यांच्या संभाव्य प्रवेशाला जोरदार विरोध केला होता. खासदार दिलीप गांधी यांचेही या कार्यकर्त्यांना पाठबळ होते, मात्र हा विरोध मोडीत काढून अखेर भाजपने पाचपुते यांना पक्षात प्रवेश दिला. जिल्हय़ातील राष्ट्रवादीचे अन्य नेतेही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्याची सुरुवात पाचपुते यांच्यापासून झाली आहे.
श्रीगोंदे मतदारसंघातून पाचपुते यांनी मागच्या सात निवडणुका लढवून त्यातील सहा निवडणुकांमधे विजय मिळवला. सन १९८० पासून (अपवाद १९९९) ते आमदार आहेत. यातील सहा निवडणुकांमध्ये त्यांचे प्रत्येक वेळी वेगळे चिन्ह होते हे विशेष! यंदाही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने सातव्यांदा ते वेगळय़ा चिन्हावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. सन १९८० मध्ये अपक्ष म्हणून पाचपुते यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर जनता पक्ष, मग जनता दल, नंतर काँग्रेस, त्यातून राष्ट्रवादी, पुन्हा अपक्ष, राष्ट्रवादी आणि आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे.
नेवासे तालुक्यात काँग्रेसला िखडार पडले असून पक्षाचे येथील तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे व सचिन देसर्डा यांनीही गुरुवारी मुंबईत विनाशर्त भाजपत प्रवेश केला. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा प्रवेश मात्र काही दिवस लांबणीवर पडला आहे.