पावसाचे प्रमाण कमी झाल्याने काही कामे रखडली

वाडा : या वर्षीच्या खरीप हंगामात भात लावणीच्या कामाची शेतकऱ्यांची लगबग सुरू असून  वाडा तालुक्यातील ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांची भात लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. अनेक  दिवस पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांची भात लावणीची कामे पावसाअभावी रखडली आहेत.

वाडा तालुक्यात जवळपास १४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते, तर पाचशे हेक्टर क्षेत्रावर तूर, नाचणी, उडीद आदी पिके घेतली जातात.  काही शेतकऱ्यांनी या वर्षी प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भात लागवड केली आहे.

करोनाच्या भीतीने या वर्षी भातशेती करायची की नाही, मजूर उपलब्ध होणार की नाही या विवंचनेत येथील शेतकरी अडकला होता. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तसेच स्थानिक मजुरांची चांगली साथ मिळाल्याने तसेच टाळेबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या कुटुंबातील अनेकजणांची बाहेरची कामे बंद असल्याने त्यांच्या मदतीने या वेळी शेतकऱ्यांना भात लावणीची कामे लवकर आटपण्यास मदत झाली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या नियमांचे पालनही या वेळी होत आहे. दरम्यान काही दिवस पावसाने दडी मारल्याने येथील काही शेतकऱ्यांची हळव्या वाणातील भात लावणीची कामे रखडली आहेत. रोप वाढीला जास्तीचे दिवस होऊन गेल्यामुळे या शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तयार रोपांना चांगली मागणी

वाडय़ातील वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळ या शेतकरी गटातील २० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन भात रोपवाटिका (गादीवाफे) तयार केले आहेत. या रोपांची लावणी यंत्राच्या मदतीने तसेच हातानेही करता येऊ  शकते. येथील शेतकऱ्यांसाठी सुधारित भाताच्या वाणांची रोपे येथील शेतकरी गटाने बनविली असून ती विक्रीसही ठेवल्याने या तयार रोपांनाही चांगली मागणी  मिळत आहे. वाडा कोलम, झीणी, सुरती या स्थानिक वाणांबरोबरच सुधारित कर्जत-३, कर्जत-७ तसेच हायब्रीडमध्ये सह्यद्री, रूपाली, दप्तरी, वायएसआर, सोनम या वाणांची अधिक लागवड या वर्षी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

करोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे मजुरांची चणचण जाणवली, मात्र या वेळी आधुनिक तंत्रज्ञानाची अधिक जोड दिल्याने अधिक वेगाने लावणीची कामे पूर्ण झाली.

– सुनील पाटील, शेतकरी, पोशेरी, ता. वाडा.