रत्नागिरी जिल्ह्यत गेल्या महिन्यातील मुसळधार पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईपोटी एकूण ९ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यातून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होणार आहे.

जिल्ह्यची आढावा बैठक पालकमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले की, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्या महिन्यात सुमारे आठवडाभर कोकणात मुसळधार पाऊस पडला. कापणीला आलेल्या भातशेतीचे या पावसाने मोठे नुकसान केले. त्यामुळे महसूल व कृषी खात्यातर्फे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्यात आला. जिल्ह्यतील एकूण ११ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्या आधारे नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून ९ कोटी ५८ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. पंचनामे करताना शेतकऱ्यांचा बँक खाते क्रमांक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रति हेक्टर १० हजार रुपये ( गुंठय़ाला १०० रूपये), या दराने भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा होणार आहे.

याचबरोबर,  गेल्या जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्री वादळामध्ये मंडणगड आणि दापोली तालुक्याचे मोठे नुकसान झाले. या आपद्ग्रस्तांसाठी ३० कोटी रूपयांचा जादा जमा झालेला निधी जादा शासनाला परत जाणार आहे. मात्र त्यापैकी १० कोटी रूपये संसारोपयोगी साहित्य गमावलेल्या कुटुंबांना देण्याचा प्रस्ताव आहे. शासनाच्या वित्त विभागाच्या परवानगीने तो खर्च करण्याचा प्रयत्न आहे.

एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती वाईट असून करोनामुळे त्यामध्ये आणखी भर पडली आहे. असे नमूद करून परब म्हणाले की, कर्मचाऱ्यांची दिवाळी चांगली झाली म्हणून आम्ही एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. कर्मचाऱ्यांचा पगार, डिझेल इत्यादी प्राथमिक खर्च त्यातून भागणार आहे. मात्र एकूण परिस्थिती पाहता एसटीचा प्रवासी कमी होताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढणार तोटा भरून काढण्यासाठी आम्ही जुन्या झालेल्या ३ हजार गाडय़ा मालवाहतुकीसाठी काढल्या आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटीची स्वतंत्र टायर रिमोल्डिंग कंपनी आहे.

यामध्ये आतापर्यंत फक्त एसटीचे टायर रिमोल्ड केले जात होते. मात्र आता बाहेरच्या कंपन्यांच्या गाडय़ांचेही काम येथे करण्यात येणार आहे. एसटीच्या विविध आगारांमध्ये गाडय़ांच्या बॉडय़ा बांधल्या जातात. तेथे आता खासगी वाहनांच्या बॉडय़ा बांधण्याचेही काम एसटी घेणार आहे. याचबरोबर, एसटीच्या पंपांवर फक्त एसटीच्या गाडय़ांना डिझेल दिले जात होते. आम्ही प्रायोगिक तत्वावर राज्यातील ३० पंपांवर खासगी गाडय़ांनाही डिझेल, पेट्रोल वितरीत करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. त्यामध्ये रत्नागिरीतील दोन पंपांचा समावेश आहे. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला तर अशा पंपांची संख्या वाढवण्यात येणार आहे. भारमान घटत चालल्याने डिझेलवर होणारा खर्च कमी करण्यासाठी सीएनजी, एलएनजी किंवा इलेक्ट्रॉनिक गाडय़ा मंडळाच्या ताफ्यात आणण्याचा महामंडळाचा विचार आहे.