ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याची सध्या दुरवस्था झाली आहे. पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या किल्ल्याचे अवशेष ढासळण्यास सुरुवात झाली आहे. या किल्ल्यांचे वेळीच संवर्धन केल नाही तर मराठा साम्राज्याच्या शौर्याची गाथा सांगणारा हा अनमोल ठेवा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
 सागरी सीमांवर जो राज्य गाजवेल, तो लगतच्या भूभागावरही अधिराज्य गाजवेल, हे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणले होते. यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी कोकण किनारपट्टीवर देशातील पहिल्या मराठा आरमाराची उभारणी केली होती. सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी कोकण किनारपट्टीवर जलदुर्गाची उभारणी केली होती. मुरुडचा पद्मदुर्ग किल्लाही यापैकी एक. जंजिऱ्याच्या सिद्धी घराण्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मुरुड शहराच्या पश्चिमेला सुमुद्रात एका बेटावर या किल्ल्याची उभारणी करण्यात आली. कासवाच्या आकाराच्या बेटावर बांधकाम झाल्याने या किल्ल्याला कासा किल्लाही संबोधले जात असे. तर किल्ल्याची तटबंदीचे बुरूज कमळाच्या आकारासारखे असल्याने किल्ल्याचे नाव पद्मदुर्ग पडले. छत्रपती संभाजी राजांनी या पद्मदुर्गावरून मुरुडच्या जंजिरा किल्ल्यावर दोन वेळा चढाई केली होती.
  आज मात्र या ऐतिहासिक किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळण्यास सुरुवात झाली आहे. सागरी लाटांच्या तडाख्याने तटबंदीच्या दगडांची झीज होण्यास सुरुवात झाली आहे. किल्ल्यावरील तोफा गंजून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींमध्येही किल्ल्याबाबत अनास्था पाहायला मिळते आहे. दळणवळणाची साधने सहज उपलब्ध होत नसल्याने पर्यटकांनी किल्ल्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा वारसा असणाऱ्या या ठेव्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
कोकण कडा मित्र मंडळाने आणि निसर्ग साथी मंडळाने या किल्ल्यावर जागराचे कार्यक्रम करून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र जनजागृती झाली असली तरी पुरातत्त्व विभाग काही जागृत झालेला नाही. किल्ल्याची ढासळती तटबंदी लक्षात घेऊन पुरातत्त्व विभागाने किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.