संत गाडगेबाबांच्या काही काळ सहवासात असलेले, त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन प्रचार व प्रसार करणारे संत साहित्यिक पद्मनाभ हनुमंत पाटील (७६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले येथील रहिवासी आहेत.
संत साहित्यिक, पत्रकार, लेखक, कवी, भजनीबुवा व कीर्तनकार म्हणून पद्मनाभ पाटील ओळखले जात. संत गाडगेबाबा यांच्यासमवेत त्यांनी पाच वर्षे काम केले. त्यांच्या विचारांनी ते प्रेरित झाले होते. परेल येथील संत गाडगेबाबा महाराज धर्मशाळेचे ते विश्वस्त होते.
आंदुर्ले-कुंभारभाले येथे संत गाडगेमहाराज प्रार्थना मंदिराची त्यांनी स्थापना केली. १९७७ मध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने आंदुर्ले कापडोसवाडी येथे संत गाडगेमहाराज मार्ग त्यांनी श्रमदानाने बांधला.
संत गाडगेमहाराज यांच्या जीवन चरित्रावर ‘दिनांचा कैवारी’, ‘तोचि साधु ओळखावा’, प्रहार व गाडग्यातील ‘शिदोरी’, संत भालचंद्र महाराज यांच्यावर ‘योगियांचे योगी’, राऊळ महाराज चरित्र (राजयोगी), गिरिनाथ आंबिये महाराज चरित्र (यतिराज), नामदेव महाराज चरित्र (ताननाथ), हरी ओम बागवे चरित्र (दासांचे दास), मुंबईचे शिल्पकार स. का. पाटील यांच्या आठवणी आदी अनेक पुस्तके लिहिली.
संगीत गोकण महिमा, नाठाळाचे माथा देऊ काठी, संत गाडगेबाबा, तुका झाला पांडुरंग, असे विविध कथासंग्रह तसेच विविध साहित्य त्यांनी लिहिले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, दोन भाऊ, पुतणे असा परिवार आहे.