संत जनाबाई व संत मोतीराम महाराज  यांच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्यासाठी प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर  पुणे विभागीय आयुक्तांनी अशा प्रकारची परवानगी देऊ  नये हे सांगितल्यानंतर परभणी जिल्हा प्रशासनाने या हेलिकॉप्टर वारीची परवानगी नाकारली आहे.

‘प्राण धरियला कंठी, जनी म्हणे देई भेटी’ या संत जनाबाईंच्याच अभंगाची आठवण व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  मराठवाडय़ातून केवळ पैठण येथील संत एकनाथ महाराज पालखीला अशी परवानगी देण्यात आली आहे.

उद्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गर्दी होऊ नये म्हणून बाहेरून कोणीही येणार नाही, यासाठी तेथील प्रशासनाच्या वतीने प्रचंड खबरदारी घेतली जात आहे. हेलिकॉप्टरने येणाऱ्या मानाच्या नऊ  पालख्यांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश मिळणार नाही, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात. संत जनाबाई यासुद्धा वारकरी परंपरेतील महत्त्वाच्या संत मानल्या जातात. मात्र केवळ नऊ  पालख्यांशिवाय अन्य कोणालाही परवानगी नसल्याने गंगाखेडहून संत जनाबाई व संत मोतीराम महाराज यांच्या पादुका उद्या पंढरपुरात दाखल होण्यात परवानगीचा अडथला निर्माण झाला आहे.

हा पेच उद्भवल्यानंतर अच्युत महाराज दस्तापूरकर, मनोहर महाराज केंद्रे, संयोजक गोविंद यादव आदींनी मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेतली. जर हेलिकॉप्टरद्वारे परवानगी मिळत नसेल तर केवळ पाचजणांसाठी खासगी वाहनाद्वारे पादुका नेण्याची परवानगी मिळावी, कोणत्याही परिस्थितीत ही परंपरा खंडित होऊ  नये, अशी मागणी या सर्वानी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्याशी संपर्क साधला, मात्र तेथील प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पुणे विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली. त्यामुळे यंदा संत जनाबाई विठ्ठलाच्या भेटीसाठी जाऊ  शकणार नाहीत, असा अपूर्व पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

गोविंद यादव यांच्यासह मनोहर महाराज केंद्रे आदींनी नुकतीच पुणे विभागीय आयुक्तांची भेटही घेतली. मात्र पुणे विभागीय आयुक्त, सोलापूर जिल्हा प्रशासन यांनी बाहेरून येणाऱ्या कोणालाही परवानगी  दिली जाऊ  नये, अशी भूमिका घेतली.

संत जनाबाई व संत मोतीराम महाराज यांच्या पादुका हेलिकॉप्टरने नेण्यासंदर्भात आपल्याकडे परवानगीचा अर्ज आला होता. या संदर्भात पुण्याच्या विभागीय आयुक्तांशी आपली चर्चाही  झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेण्यात येत असल्याने त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर परवानगीचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

-दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी</p>