पालघरमध्ये शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाचेच पाणी चक्क गढूळ आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत शासकीय स्तरावरून दुजोरा मिळत नसला, तरी याची प्रचिती पालघर आणि माहीम येथील नागरिकांना आल्याचे दिसून येत आहे.

पालघर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाचे पडणारे पाणी घरगुती वापरासाठी साठवले जात असते. शुक्रवारी सायंकाळी अनेक पाणी साठवलेले पाणी पाहिले असता ते पाणी गढूळ असल्याचे निदर्शनास आले. तसेच आज त्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. काल झालेल्या पावसात मातीयुक्त पदार्थ किंवा रसायनमिश्रित पाणी असल्याची शक्यता अनेक जणांकडून वर्तवण्यात आल्या. तसेच बाहेर उघड्यावर ठेवलेल्या वाहनांवर पडलेले पाण्याचे थेंब सुकल्यानंतर त्यावर मातीचे डाग शिल्लक राहिल्याचे दिसून आल्याचेदेखील माहीम येथील रहिवासी अभिजीत पाटील यांनी सांगितले.

पालघर- माहीम येथील शेतकऱ्यांना काल पावसाची सर झाल्यानंतर इतरवेळी वाहणारे पाणी काल गढूळ दिसत असल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकारची कोणतीही तक्रार कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आली नसल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी प्रथमच असा प्रकार या परिसरात घडल्याने नागरिकांमध्ये हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.